शालेय पोषण आहारात आता भाकरी अन् आंबीलही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:30 PM2019-07-10T14:30:37+5:302019-07-10T14:32:43+5:30
शालेय पोषण आहारात आता ज्वारी, बाजरीची भाकरी अन् नाचणीची आंबीलही मिळणार आहे.
राजकुमार चुनारकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शालेय पोषण आहारात आता ज्वारी, बाजरीची भाकरी अन् नाचणीची आंबीलही मिळणार आहे. आहारासाठी मिळणाऱ्या तांदळात २५ टक्के कपात करून त्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणीचा पुरवठा होणार आहे. ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या कालावधीसाठी शाळांना किती ज्वारी, बाजरी, नाचणी लागेल याची माहिती जिल्हा परिषदांकडून मागविली आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) प्राचार्य यांच्यासमवेत अप्पर मुख्य शिक्षण सचिवांची नुकतीच शिक्षण परिषद झाली. या परिषदेत शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत.
पहिली ते पाचवीसाठी प्रति विद्यार्थी प्रतिदिन १०० ग्रॅम व सहावी ते आठवीसाठी प्रति विद्यार्थी प्रतिदिन १५० ग्रॅम तांदूळ मंजूर केला जातो. आहारात विविधता यावी, यासाठी तांदळाची मागणी २५ टक्क्याने कमी करून त्याऐवजी ज्वारी, नाचणी व बाजरी या धान्याचा वापर करावा. ज्वारी, नाचणी, बाजरी या धान्याचा वापर करून विद्यार्थ्यांना देण्याकरिता विविध पदार्थ, पाककृती याची जिल्हास्तरावरून निश्चिती केल्यानंतर त्यानुसार ज्वारी, नाचणी व बाजरीची आॅक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या करिताची मागणी शिक्षण संचालनालयास सादर करावी, असे पत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व जिल्हा परिषदांना पाठविले आहे. दरम्यान, सर्व जिल्ह्यांमधून ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर नोंदविलेल्या मागणीनुसार ज्वारी, बाजरी, नाचणी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनास प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने म्हटले आहे.
शासनाचे शालेय पोषण आहारात बदला बाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. पोषण आहारात आता २५ टक्के बाजरीचा समावेश राहणार आहे त्याबाबतची माहिती जिल्हास्तरावर पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे
- किशोर पिसे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चिमूर.