संस्था पदाधिकाऱ्याच्या पुत्राची शाळेत गुंडागर्दी
By admin | Published: July 13, 2015 01:11 AM2015-07-13T01:11:20+5:302015-07-13T01:11:20+5:30
कुंभेझरी येथील कै. अण्णाभाऊ साठे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेच्या कोषाध्यक्षा असलेल्या महिलेच्या सुपुत्राने मद्यधुंद अवस्थेत गुंडगिरी करून ...
दोघांना अटक : कुंभेझरी येथील घटना
गडचांदूर : कुंभेझरी येथील कै. अण्णाभाऊ साठे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेच्या कोषाध्यक्षा असलेल्या महिलेच्या सुपुत्राने मद्यधुंद अवस्थेत गुंडगिरी करून कर्मचारी व विद्यार्थ्यांना तब्बल दोन ते तीन तास वेठीस धरल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी दहशतीखाली असून या गुंडप्रवृत्तीच्या पुत्राकडून शाळेतील कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका असल्याची तक्रार प्राचार्य डी. एन. तेलंग यांनी पोलिसात दिली. यावरून जिवती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
आशिष नरसिंग नामवार व त्र्यंबक सोपान सूर्यवंशी असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथील कै.अण्णाभाऊ साठे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व जिजामाता मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. प्राचार्यच्या कक्षात प्राचार्य दीपक तेलंग, वसतिगृहाचे अधीक्षक विनोद डवरे, कामाठी भोला धोबे, शिपाई मारोती बोरीकर, संस्थेचे संचालक संतोष मोतेवाड चर्चा करीत असताना संस्थेच्या कोषाध्यक्ष श्रीमती नामवार यांचा मुलगा आशिष नरसिंग नामवार व त्र्यंबक सोपान सूर्यवंशी यांनी प्राचार्यच्या कक्षेत प्रवेश करून प्राचार्य दीपक तेलंग व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दगडफेक सुरू केली. सुदैवाने विद्यार्थ्यांना दगड लागला नाही. आशिषचा मद्यधुंद स्थितीतील रूद्रवतार बघून त्याला कक्षात कुलूप लावून बंद केले व या घटनेची तक्रार जिवती पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार आशिष नामवाड व त्र्यंबक सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.
दोघेही गुंड प्रवृत्तीचे असल्याने जिविताला धोका असून त्यांना हद्दपार करण्याची मागणी प्राचार्य दीपक तेलंग व संचालक संतोष मोतेवाड यांनी केली आहे. (वार्ताहर)