चंद्रपूर जिल्ह्यातील ९९६ शाळांमध्ये शालेय बचत बँक सुरू

By साईनाथ कुचनकार | Published: February 3, 2024 04:30 PM2024-02-03T16:30:55+5:302024-02-03T16:31:08+5:30

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ९९६ शाळांमध्ये शालेय बचत बॅंक सुरू करण्यात आल्या आहेत.

school savings bank started in 996 schools of chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातील ९९६ शाळांमध्ये शालेय बचत बँक सुरू

चंद्रपूर जिल्ह्यातील ९९६ शाळांमध्ये शालेय बचत बँक सुरू

साईनाथ कुचनकार, चंद्रपूर: शाळेप्रति उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, त्यातून स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू आहे. या अभियानाचा आढावा नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी सन्मित्र सैनिक शाळा चंद्रपूर येथे घेतला. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ९९६ शाळांमध्ये शालेय बचत बॅंक सुरू करण्यात आल्या आहेत.

आढावा सभेमध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक राजकुमार हिवारे, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी अभियानात किती शाळांचा सहभाग आहे. या उपक्रमात विद्यार्थी-शिक्षकांचा उत्साह कसा आहे, याबाबत त्यांनी आढावा घेतला. दरम्यान, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांंकडून अधिक माहिती जाणून घेतली.

विद्यार्थी अनुभवताहेत बॅंकेचे व्यवहार

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थी आर्थिक साक्षर व्हावा, त्याला बचतीची सवय लागावी, बँकेचे सर्व व्यवहार समजावे त्याबाबत आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन यांच्या प्रेरणेतून आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शालेय बचत बॅंक उपक्रम ९९६ शाळांमध्ये सुरू केलेला आहे.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना बँकेचे आर्थिक व्यवहार कसे पूर्ण करतात याची प्रत्यक्ष समज अनुभवातून दिली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला बँकेचे पासबुक उपलब्ध करून दिलेले आहे. शालेय बचत बँकेच्या व्यवहारांसाठी पासबुक, पैसे काढण्याची व जमा करण्याची स्लिप, लेजर, कॅशबुक इ. साहित्य छापून तसेच शिक्का, इतर आवश्यक शिक्के व टोकनदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी अशी केली बचत

कोरपना तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांनी ४२ हजार ९४६ रुपये, जिवती तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, पालडोह येथील विद्यार्थ्यांनी ३५ हजार ३५१ रुपये, सिंदेवाही तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, देलनवाडी येथे २२ हजार ६७५ रुपये, गोंडपिपरी तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, कारंजी येथे २० हजार १७८ रुपये आणि भद्रावती तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, आष्टा येथील विद्यार्थ्यांनी १५ हजार ८७९ रुपये शालेय बचत बँकेत जमा केले आहेत.

Web Title: school savings bank started in 996 schools of chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक