विद्यार्थ्यांविना सुरू होणार आजपासून शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:04+5:302021-06-28T04:20:04+5:30
चंद्रपूर : शाळेचा पहिला दिवस, शाळा उत्सव, प्रभातभेरी, पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे रुसवे, रडने, नवीन पुस्तक, गणवेश, नवीन वर्ग मित्र ...
चंद्रपूर : शाळेचा पहिला दिवस, शाळा उत्सव, प्रभातभेरी, पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे रुसवे, रडने, नवीन पुस्तक, गणवेश, नवीन वर्ग मित्र मैत्रीण यापासून यावर्षीही विद्यार्थी मुकणार असून, विद्यार्थ्यांविनाच आजपासून (दि. २८) शाळा सुरू होणार आहे. दरम्यान, ऑनलाईन अभ्यासक्रमावरच विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागणार आहे. मात्र, शिक्षकांना ऑनलाईन अभ्यासक्रमासंदर्भातील अहवाल शिक्षण विभागाला द्यावा लागणार आहे.
कोरोनामुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहे. मागील शैक्षणिक सत्रात वर्षभर ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर मात्र परीक्षा न घेताच विद्यार्थी वर्गोन्नत झाले. दरम्यान, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आजपासून होणार आहे. मात्र, कोरोना संकटामुळे शाळा कशा पद्धतीने सुरू होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे, शिक्षणसंचालकांच्या पत्रानुसार शाळेमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे, तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती, तर १ ते ९ च्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यातच कोरोना संकटामुळे पुन्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहे. त्यामुळे शाळा सुरूबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
बाॅक्स
शिक्षकांत संभ्रम
आजपासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे पुन्हा निर्बंध लादण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक संचालकांच्या पत्रानुसार शाळेत उपस्थित राहायचे की, जिल्ह्यातील निर्बंधानुसार जायचे नाही. याबाबत मात्र शिक्षकांमध्ये संभ्रम वाढला आहे.
कोट
विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. विद्यार्थी, पालकांकडे असलेल्या साधनांद्वारे विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य आहे. त्यांना त्या पद्धतीने, तसेच जिथे सुविधा नाही तिथे शिक्षकांद्वारे गृहभेटी, गृहपाठ जमेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविल्या जाणार असून, कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येणार नाही. सुरुवातीला काही दिवस कोरोना परिस्थिती, तसेच विद्यार्थ्यांकडे असलेल्या ऑनलाईन, ऑफलाईन सुविधांसदर्भात आढावा घेऊन त्यानंतर शासन आदेशानुसार पुढील दिशा ठरविण्यात येईल.
-उल्हास नरड
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
बाॅक्स
एकूण शाळा - २४९८
एकूण शिक्षक - १४००५
बाॅक्स
जिल्हा परिषद शाळा- १५५७
महापालिका शाळा-५९
समाज कल्याण-५६
आदिवासी विभाग- ६०
खासगी अनुदानित- ३७५
विना अनुदानित-३११
बाॅक्स
९ लाख १५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तक
सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शाळांंमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. यावर्षी जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार ५७८ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण शिभागाने ९ लाख १५ हजार ४५८ पुस्तकांची बालभारतीकडे मागणी नोंदविली आहे.