उन्हाळ्याच्या सुटीतही चिमुकल्यांची शाळेत हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:00 PM2018-06-06T23:00:14+5:302018-06-06T23:00:50+5:30
विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या की, ना पाटी, ना अभ्यास, ना शाळा, फुल्ल मस्ती. अनेक विद्यार्थी मामाच्या गावाला जाऊ या... म्हणत मनसोक्त आनंद व्यक्त करीत असतात. परंतु, मामाच्या गावाला गेल्यानंतरही शाळेत खंड पडू नये, विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येवू नये याकरिता वरोरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने बोर्डा गावात उन्हाळ्यात सुटीच्या दिवसात शाळा सुरू केली आहे. या शाळेत वाढत्या तापमानातही चिमुकल्यांची मोठ्या संख्येने हजेरी दिसून येत आहे.
प्रवीण खिरटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या की, ना पाटी, ना अभ्यास, ना शाळा, फुल्ल मस्ती. अनेक विद्यार्थी मामाच्या गावाला जाऊ या... म्हणत मनसोक्त आनंद व्यक्त करीत असतात. परंतु, मामाच्या गावाला गेल्यानंतरही शाळेत खंड पडू नये, विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येवू नये याकरिता वरोरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने बोर्डा गावात उन्हाळ्यात सुटीच्या दिवसात शाळा सुरू केली आहे. या शाळेत वाढत्या तापमानातही चिमुकल्यांची मोठ्या संख्येने हजेरी दिसून येत आहे.
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक मुले अभ्यासापासून स्वत:ला दूर ठेवतात. काही जण हजारो रूपये खर्च करून उन्हाळी प्रशिक्षण शिबिर लावतात तर काही जण विशेष वर्ग लावून स्वत:ला बंधनात टाकून घेत असतात. याला पालकांचीही सहमती असते. परंतु, ग्रामीण भागात या सोयी उपलब्ध नाही. त्यात आर्थिक चणचण; यामुळे ग्रामीण भागातील मुले उन्हाळ्याच्या सुट्यात हिरमुसले होतात.
याची दखल घेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने वरोरा शहरानजीकच्या जिल्हा परिषद बोर्डा शाळेत उन्हाळ्यात शाळा सुरू करण्याची संकल्पना मांडली. शाळा सुरू करण्यापूर्वी साधन व्यक्तींनी पालकांच्या भेटी घेवून संकल्पना समजावून सांगितली. पालकांनी याला सहमती दिली. त्यामुळे ही शाळा सकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंत सुरू असते. या शाळेत कुठलाही धाक, जबरदस्ती, अभ्यास करणे गरजेचे नाही. पाहिजे ती कृती करा, हसत खेळत शिक्षण घ्या, असे आनंददायी वातावरण आहे. त्यामुळे काही विद्यार्थी तबला-पेटीवर ठेकाही धरतात. तर काही विद्यार्थी टाकावू वस्तुपासून टिकावू वस्तू तयार करतात. शिक्षकही प्रेमाने शिकवत असल्याने इयत्ता एक ते सातवी पर्यंत या शाळेत ५० मुलेमुली सहभागी झाले आहेत. घरी पाहुणा म्हणून आलेल्या मुलांनाही या शाळेत प्रवेश दिल्या जातो. विद्यार्थ्यांना आणने व घरी सोडण्याचे कामही शिक्षक सातत्याने करीत आहेत. हसत-खेळत शिक्षण मिळत असल्याने कोणताही विद्यार्थी शाळेला बुट्टी मारत नाही. चार तास शाळेची वेळ केव्हा निघून जाते, हे विद्यार्थ्यांना कळत नाही. इयत्ता कुठलीही असो प्रवेश नि:शुल्क आहे. या उपक्रमाने वरोरा पं. स. शिक्षण विभागाने एक नवीन दिशा दिली आहे.
शिक्षक स्वत: करतात खर्च
विद्यार्थी उन्हाळ्याच्या शाळेत शिकत असताना लागणारे साहित्य शिक्षक स्वत:च्या खर्चाने विकत आणत असतात. यासाठी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क घेतल्या जात नाही, ही एक महत्त्वाची बाब आहे. जि. प. शाळा बोर्डा येथील उन्हाळी शाळा वरोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामदास चौधरी यांच्या नेतृत्वात सुरू असून साधन व्यक्ती बाळू जीवने, खुशाल पाचभाई, चंद्रकांत पेटकर, संतोष कोमरेड्डीवार, प्रतिभा हरणे, मनीषा राऊ त कार्यरत आहेत.