शिक्षकांविना पहाडावरील शाळांवर अवकळा
By admin | Published: July 2, 2016 01:15 AM2016-07-02T01:15:40+5:302016-07-02T01:15:40+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकता यावे, कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासनाने गाव तिथे शाळा दिल्या.
विभागाचे दुर्लक्ष : देवलागुडा शाळेत पाच वर्गांसाठी दोनच शिक्षक
शंकर चव्हाण जिवती
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकता यावे, कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासनाने गाव तिथे शाळा दिल्या. पण त्या ठिकाणी शिकवायला गुरुजी आहे की नाही, याचा आढावा घेण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरत आहे. पहाडावरील अनेक खेडे गावात शाळा असूनही शिक्षकांविना शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. देवलागुडा येथील जिल्हा परिषद शाळा त्याचेच मूर्तीमंत उदाहरण आहे.
जिवती पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवलागुडा जिल्हा परिषद शाळेला मागील वर्षापासून पाचवा वर्ग जोडण्यात आला. १ ते ५ वर्ग असलेल्या या शाळेत ७७ विद्यार्थी असताना केवळ दोनच शिक्षक येथे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांना वेळेवर डाक देणे, सभेला जाणे, बँकेत जाणे, अशी विविध कामे शिक्षण विभागाने सोपविल्याने दोनपैकी एकच शिक्षक शाळेत असतो. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत मागील वर्षी संबंधित विभागांना नवीन शिक्षकांची नेमणूक करावी, यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. पण गुरुजी काही मिळाले नाही. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. आवश्यक तेवढे विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत.
मात्र नवीन शिक्षकाच्या नियुक्तीबाबत अद्यापही शिक्षण विभागाच्या हालचाली दिसत नाही. शासन नियमानुसार १ ते ५ वर्गासाठी कमीत कमी चार शिक्षकांची गरज आहे. पण शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे दोनच शिक्षकांना १ ते ५ वर्गाची शैक्षणिक जबाबदारी पार पाडावी लागत आहे. विद्यार्थी संख्येनुसार आणि वर्गानुसार शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा अन्यथा शाळेला कुलूप ठोकले जाईल, असा इशारा येथील पालकांनी दिला आहे.
शाळेत १ ते ५ वर्ग असून ७७ विद्यार्थीसंख्या आहे. दोनच शिक्षकांना संपूर्ण भार सांभाळावा लागतो. त्यात डाक देणे, मिटींगला जाणे यासह अनेक शैक्षणिक कामासाठी मुख्याध्यापकांनाच जावे लागते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
- एम.एम. पवार, मुख्याध्यापक
जि.प.प्रा.शाळा, देवलागुडा