शाळांना मिळणार ९२ सुट्या! ४४ उन्हाळी, २४ सार्वजनिकसह इतर दिवशीही सुटी
By साईनाथ कुचनकार | Published: January 10, 2024 05:47 PM2024-01-10T17:47:04+5:302024-01-10T17:48:15+5:30
शाळेला सुटी मिळाली की विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
चंद्रपूर: शाळेला सुटी मिळाली की विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सुटीच्या दिवशी काय करायचे, कुठे फिरायला जायचे, काय खायचे आदी प्लॅनिंग ते करतात. शाळेत जाण्यापेक्षाही सुट्या किती याचीच बहुतांश विद्यार्थ्यांना जास्त उत्सुकता असते. आता नुकतेच २०२४ हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने वर्षभरातील सुट्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विविध सण आणि उत्सवादरम्यान तब्बल ९२ सुट्या यावर्षी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मिळणार आहे. यामध्ये दिवाळीसाठी १०, उन्हाळ्यात ४४, स्थानिक सुट्या ९, मुख्याध्यापक अधिकारातील आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या प्रत्येकी ३ सुट्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यातील शाळांना १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची एक अधिकची सुटी मिळणार आहे.
अशा असतील सुट्या
जाहीर करण्यात आलेल्या एकूण सुट्यांमध्ये सार्वजनिक २४, जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या ३, स्थानिक सुट्या ९, मुख्याध्यापक अधिकारातील सुट्या २, उन्हाळ्यातील ४४ आणि दिवाळीसाठी १० दिवसांच्या सुट्या राहणार आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या दहा दिवसाच्या सुट्या रविवार आणि शासकीय सुट्या वगळून राहणार आहे.
सार्वजनिक सुट्या
प्रजासत्ताक दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री, होळी, गुड फ्रायडे, गुढीपाडवा, रमजान ईद, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती, महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, बकरी ईद, मोहरम, स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्ष, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद, महात्मा गांधी जयंती, दसरा, दिवाळी-लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, गुरुनानक जयंती, ख्रिसमस.
स्थानिक सुट्या (मराठी माध्यम)
मकर संक्रांत, रमजान ईद पहिला दिवस, रमजान ईद दुसरा दिवस, मोहरम, जागतिक आदिवासी दिन, पोळा, वीर बाबुराव शेडमाके शहीद दिन, महापरिनिर्वाण दिन
मागील वर्षीच्या तुलनेत एक सुटी कमी
शिक्षण विभागाने मागील वर्षी म्हणजे, २०२३ मध्ये ९३ सुट्या जाहीर केल्या होत्या. दरम्यान, यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या सुट्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत एक सुटी कमी केली आहे.