विज्ञानाने माणसाच्या जीवनात आमूलाग्र क्रांती केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2017 12:41 AM2017-02-13T00:41:17+5:302017-02-13T00:41:17+5:30
भारतीय समाजात यंत्रयुगाने, तांत्रिक सुविधांनी, नव्या शिक्षण पद्धतीने दळण-वळणाच्या गतिमानतेने, नव्या प्रसारमाध्यमानी खूप बदल घडवून आणले आहे.
आनंद पाटील याचे प्रतिपादन : कोरपना येथे राष्ट्रीय चर्चासत्र
राजुरा : भारतीय समाजात यंत्रयुगाने, तांत्रिक सुविधांनी, नव्या शिक्षण पद्धतीने दळण-वळणाच्या गतिमानतेने, नव्या प्रसारमाध्यमानी खूप बदल घडवून आणले आहे. विज्ञानाने समानता, बुद्धीवादी पुरोगामी विचारसरणी प्रभावी झाली. त्यामुळे विज्ञानाने मानवी जीवनात अमुलाग्र क्रांती केली. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तुलनाकार डॉ. आनंद पाटील यांनी केले.
कला महाविद्यालय कोरपना तर्फे विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली पुरस्कृत एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन विज्ञानवादी मराठी साहित्य : शोध आणि बोध या विषयावर हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
चर्चासत्राचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर याच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्यानी अॅड.बाबासाहेब वासाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रभाकरराव मामुलकर, गोंडवाना विद्यापीठाचे ओ.एस.डी. डॉ. रोकडे, संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. मुर्लीधर धोटे, उपाध्यक्ष दत्तात्रय येगीनवार, साजीद बियाबाणी आदी उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात कुलगुरु कल्याणकर म्हणाले, विज्ञान बुद्धीला कलेपेक्षा अधिक महत्व देते. बुद्धीवंतांची प्रज्ञा व कलावंताची प्रतिभा यांचे वेगळेपण, व्यक्तिनिष्ठता, वैज्ञानिक संकल्पना, भाषा आणि कलेची भाषा यामध्ये फरक असतो. विश्वातील सत्यदर्शन बुद्धीद्वारा विज्ञान घडविते. तर सौंदर्य दर्शनाच्या माध्यमातून सत्याकडे पाहण्याची गरज कलेला जाणवते. त्यामुळे जीवन समजून घेण्याची किमया विज्ञान साहित्याने साध्य केली आहे. यावेळी चर्चासत्राचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वारकड यांनी केले. चर्चासत्राचे संचालन डॉ. नरेंद्र आरेकर यांनी तर आभार संस्थेचे कोषाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात औरंगाबादचे विज्ञान साहित्यिक डॉ. रंजन गर्गे यांनी पीपीटीद्वारा भारतीय संस्कृतीतील विज्ञान भास्करचार्यापासून तर आजपर्यंतच्या विज्ञानाचा आढावा अनेक उदाहरणांनी स्पष्ट केला. निबंध वाचक म्हणून धुळे येथील डॉ. फुला बागुल, अमरावतीच्या डॉ मोना चिमोटे, बांदा सिंधुदुर्ग येथील डॉ. गोविंद काजरेकर, महाराष्ट्रातील या नामवंत विज्ञान साहित्याच्या अभ्यासकांनी अभ्यासपूर्ण माहिती सादर केली.
खुल्या निबंध वाचनात डॉ. पद्मरेखा धनकर यांनी ‘मर्ढेकरांच्या काव्यातील वैज्ञानिक जाणिवा’ या विषयावर तर डॉ. गजानन सपाट यांनी विज्ञानवाद संकल्पना या निषयावर निबंध वाचन केले. चर्चासत्रात १८१ लोकांनी सहभाग नोंदविला. संचालन डॉ. गणेश चुदरी तर आभार प्रा. राजेंद्र देवाळकर यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)