मांजाने गळा कापला
By admin | Published: January 13, 2017 12:33 AM2017-01-13T00:33:16+5:302017-01-13T00:33:16+5:30
पतंगाच्या मांजाने विद्यार्थिनीचा गळा कापल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बल्लारपूस बायपास मार्गावरील
विद्यार्थिनी जखमी : रुग्णालयात उपचार सुरू
चंद्रपूर : पतंगाच्या मांजाने विद्यार्थिनीचा गळा कापल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बल्लारपूस बायपास मार्गावरील जयश्रीया लॉनजवळील पुलाजवळ घडली. सुदैवाने तिचा जीव वाचला असला, तरी गंभीर जखमी झाल्याचे तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सपना गयाप्रसाद सोनकर (२१) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. मांजाविक्रीवर बंदी असतानाही शहारात खुलेआम विक्री होत असल्याने प्रशासनाप्रति नागरिकांत रोष पसरला आहे. महाकाली कॉलरी परिसरातील सपना सोनकर ही सरदार पटेल महाविद्यालयात बी.कॉम प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. पोलीस विभागाच्या भरतीसाठी ती सध्या तयारी करीत आहेत. नेहमीप्रमाणे दुचाकीने ती जिल्हा क्रीडा संकुलावर धावण्यासाठी जात होती. रस्त्याने जात असताना एक तरुण जयश्रीया लॉनजवळील पुलावर पतंग उडवित होता. या पतंगाच्या मांजामुळे सपनाचा गळा कापला. त्यामुळे ती दुचाकीवरुन खाली कोसळली.
यावेळी नागरिकांना घटनास्थळावर धाव घेतली. तातडीने रक्तस्त्राव थांबण्यासाठी स्कार्फ बांधला. त्यानंतर तिला डॉ. भुक्ते यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉ. मनीष मुंधडा यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मांजामुळे गळ्याला खोलवर जखम झाली मात्र, ‘जुगुलर’ वाहिनीला जखमी झाली नाही. तसेच तातडीने उपचार केल्यामुळे तिचा जीव वाचला असल्याचे डॉ. मनीष मुंधडा यांनी सांगितले. नागरिकांनी मकरसक्रांतीच्या दिवसात पतंग उडविण्याचा आनंद घ्यावा. मात्र नायलॉन, चिनी मांजाचा वापर करु नये, असे आवाहन डॉ. मुंधडा यांनी पत्रकारांशी बोलताना केले.