एसडीओ कार्यालयावर दुष्काळग्रस्तांची धडक
By admin | Published: September 24, 2015 01:25 AM2015-09-24T01:25:25+5:302015-09-24T01:25:25+5:30
तालुक्यातील मेंडकी परिसरात कमी पाऊस पडल्याने खरीप धान पिकाची रोवणी झालेली नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेती क्षेत्र पडीत आहे.
ब्रह्मपुरी : तालुक्यातील मेंडकी परिसरात कमी पाऊस पडल्याने खरीप धान पिकाची रोवणी झालेली नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेती क्षेत्र पडीत आहे. याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुष्काळ निवारण समन्वय समितीच्या वतीने मेंडकी राजस्व मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचा मोर्चा बुधवारी ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
मेंडकी परिसरातील नागरिक शेती उत्पन्नावर उपजिवीका भागवितात. परिसरातील हजारो शेतकरी व शेतमजूर शेतीवर अवलंबून आहेत. परंतु, यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांसमोर उपजिविकेचा मोठा प्रश्न उभा आहे. सरकार कंपन्या वाचविण्यासाठी मोठी आर्थिक मदत करीत आहे. परंतु, शेतकरी दररोज मरत असताना मात्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही. दुष्काळी स्थितीकडे शासनाने जातीने लक्ष घालावे व तातडीने उपाययोजना करावे, यासाठी मोर्चा काढण्यात आला.
यावेळी तहसीलदार अशोक शिवरकर यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चात शामराव इरपाते, मोतीराम विधाते, सुधाकर माहाडोरे, जिल्हा परिषद सदस्य भावना इरपाते, मंगला लोनबले, यशवंत आंबोरकर, ज्ञानेश्वर कायरकर, मधुकर करंजेकर, मोरेश्वर हर्षे, केशव आंबोरकर, विनायक पाकमोडे आदी शेतकऱ्यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)