चंद्रपुरच्या एसडीओंनी स्वत:च केली अनधिकृत नळजोडणी
By admin | Published: June 5, 2014 11:55 PM2014-06-05T23:55:10+5:302014-06-05T23:55:10+5:30
येथील उपविभागीय अधिकारी संजय दैने यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानात स्वत:च अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतल्याचा प्रकार आज उजेडात आला. गंभीर बाब म्हणजे टाकी भरण्याच्या मुख्य
चंद्रपूर: येथील उपविभागीय अधिकारी संजय दैने यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानात स्वत:च अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतल्याचा प्रकार आज उजेडात आला. गंभीर बाब म्हणजे टाकी भरण्याच्या मुख्य पाईपलाईनच्या एअर वॉलवरून ही नळजोडणी करण्यात आली आहे. महानगर पालिका याविषयात आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या सिव्हील लाईनमध्ये विविध शासकीय अधिकार्यांची निवासस्थाने आहेत. त्यातील एक निवासस्थान येथील उपविभागीय अधिकारी संजय दैने यांना मिळाले आहे. चार दिवसांपूर्वी त्यांनी पालिकेच्या अधिकार्यांना व शहरात पाणी पुरवठा करणार्या उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीशी संपर्क साधून २४ तास पाणी पुरवठा होण्यासाठी नळजोडणी करून द्या, अशी मागणी केली. मात्र २४ तास पाणी पुरवठा होईल, अशी कोणतीही पाईप लाईन नसल्याने तशी नळजोडणी देता येणार नाही, अशी भूमिका उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतली. मात्र नियमित नळजोडणी करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यादरम्यान, गुरूवारी उपविभागीय अधिकारी संजय दैने यांनी स्वत: नळजोडणी करून देणार्या खासगी कारागिराला बोलाऊन पाण्याची टाकी भरणार्या मुख्य पाईपलाईनच्या एअर वॉलवरून नळजोडणी करून घेतली. यासंदर्भात उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक योगेश समरीत यांना विचारणा केली असता, त्यांनीही या बाबीला दुजोरा दिला. अशा बेकायदेशिर पद्धतीने कुणालाही नळजोडणी करता येत नाही. उपविभागीय अधिकार्यांनी २४ तास पाणी पुरवठा होईल, अशी नळजोडणी करून मागितली होती. मात्र ते शक्य नव्हते, असे समरीत म्हणाले. (प्रतिनिधी)