कैलासनगर येथील देशी दारू दुकान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:25 AM2021-02-07T04:25:52+5:302021-02-07T04:25:52+5:30
घुग्घुस : जिल्ह्यात दारूबंदी असताना यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलिच्या मुंगोली कैलाशनगर कामगार वसाहतमधील परवानाधारक दारू दुकानातून सर्रास चंद्रपूर जिल्ह्यात ...
घुग्घुस : जिल्ह्यात दारूबंदी असताना यवतमाळ जिल्ह्यातील वेकोलिच्या मुंगोली कैलाशनगर कामगार वसाहतमधील परवानाधारक दारू दुकानातून सर्रास चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर व यवतमाळच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून दुकान सील केले.
सदर कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. दारूबंदीनंतर पाच वर्षात दुकान सील करण्याची ही पहिलीच कारवाई आहे. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत घुग्घुसपासून १० किलोमीटर अंतरावर वेकोलि मुंगोलीची कामगार वसाहत कैलासनगर आहे. येथे परवानाधारक देशी दारूचे दुकान आहे. आज शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त धाड टाकून कारवाई करून सदर परवानाधारक दुकानाला सील केले आहे. गुरुवारी याच देशी दारू दुकानांमधून २०० पेटी देशी दारू चंद्रपूर जिल्ह्यातील नारंडा येथे तस्करी होत असताना पकडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांना तस्करीबाबत माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर यवतमाळचे पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दारू तस्करी सक्तीने रोखण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर कैलासनगर येथे परवानाधारक देशी दारूच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे देशी दारूची तस्करी करणाऱ्यांना चांगलीच धडकी भरलेली आहे.