न्यायवैद्यक अहवालानंतरच आत्महत्येवर शिक्कामोर्तब, पाेलीस परिस्थितीजन्य पुरावे पडताळून पाहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 05:22 AM2020-12-08T05:22:23+5:302020-12-08T07:47:47+5:30
Sheetal Amte News : अतिविशेष व्यक्तीचे प्रकरण असल्यामुळे न्यायवैद्यक तज्ज्ञही अहवालात त्रुटी राहू नये, याची खबरदारी घेत आहेत. त्यामुळे पुरावे आणि न्यायवैद्यक अहवालाची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निष्कर्षावर पोहोचता येईल, असे सूत्रांनी सांगितले.
चंद्रपूर - आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांनी आत्महत्याच केली असावी, असा निष्कर्ष काढण्याइतपत पुरावे पोलीस तपासात पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अतिविशेष व्यक्तीचे प्रकरण असल्यामुळे न्यायवैद्यक तज्ज्ञही अहवालात त्रुटी राहू नये, याची खबरदारी घेत आहेत. त्यामुळे पुरावे आणि न्यायवैद्यक अहवालाची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निष्कर्षावर पोहोचता येईल, असे सूत्रांनी सांगितले.
डाॅ. शीतल यांचे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस रहस्यमय बनत चालले आहे. अद्याप मृत्यूचे नेमके कारण पुढे आलेले नाही. आत्महत्या का केली, ही बाबही रहस्यच आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी डाॅ. नीलेश पांडे यांच्या माहितीनुसार, डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूपूर्वीच्या सर्व घडामोडींचा तपास जवळपास पूर्णत्वाकडे आला आहे. तरीसुद्धा तपासात उणिवा राहू नयेत, म्हणून सगळ्या शक्यता गृहीत धरून तपास सुरू ठेवण्यात आला आहे.
डाॅ. शीतल यांनी आत्महत्याच केली, ही बाब एकूणच तपासावरून स्पष्ट होते. परंतु, त्यांच्या शरीरातील औषध आणि घटनास्थळी आढळलेले औषध यांचा ताळमेळ न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाशी जुळवल्यानंतरच त्याची खात्री होईल.
न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तज्ज्ञही अतिशय काळजीपूर्वक अहवाल तयार करीत आहेत. त्यात कसली उणीव राहू नये, याची दक्षता घेतली जात असल्यामुळे अहवालास उशीर होत आहे. तपासातील संशयास्पद बाबींकडेही न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे लक्ष आहे. औषधाची मात्रा मृत्यूस कितपत कारणीभूत ठरली, ही बाबही तज्ज्ञ तपासत आहेत. पोलीस तपासातील काही बाबींची पडताळणीही तज्ज्ञ करीत आहेत.
सायबर सेलच्या रिपोर्टलाही उशीर
डाॅ. शीतल यांच्या घरातून त्यांचे दोन मोबाइल, एक लॅपटाॅप व एक टॅब हे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेऊन ते चौकशीसाठी मुंबईला सायबर सेलकडे पाठविले आहे. याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. या अहवालाला बराच उशीर होत
आहे.