उद्या स्थायी समिती सभापतीच्या नावावर शिक्कामोर्तब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:24+5:302021-08-22T04:31:24+5:30
चंद्रपूर मनपात चार वर्षे यापूर्वी राहुल पावडे यांनी स्थायी समिती सभापतीपदाचा टर्म पूर्ण केला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये ...
चंद्रपूर मनपात चार वर्षे यापूर्वी राहुल पावडे यांनी स्थायी समिती सभापतीपदाचा टर्म पूर्ण केला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये निवडणूक घेण्यात आली. भाजपातील शीर्षस्थ नेत्यांच्या पाठिंब्यामुळे रवी आसवानी हे सभापतीपद विराजमान झाले. आसवानी यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०२१ मध्येच संपला होता. नियमानुसार एप्रिल २०२१ मध्ये निवडणूक घेणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्याने नगरविकास विभागाने स्थायी समिती सभापती आणि विषय समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश जारी केला. माजी सभापती राहुल पावडे यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या पदासाठी इच्छुक असणारे वसंत देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला होता. पण, त्यांना डावलून रवी आसवानी यांना सभापतीची संधी देण्यात आली. तेव्हापासून वसंत देशमुख हे नाराज आहेत. ही नाराजी उघडकीस आल्याने एक महिन्यापूर्वी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी वसंत देशमुख यांची भेट घेतली. या भेटीने भाजप व मनपाच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला पेव फुटले होते. कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने नगरविकास विभागाने स्थायी समिती सभापती आणि विषय समितीच्या निवडणुकांवर स्थगिती उठविली. याच पार्श्वभूमीवर सोमवारी स्थायी समितीची सभा होणार आहे. या सभेत सभापतीपदासाठी नाव निश्चित होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे.
बॉक्स
स्थायी समितीमधील पक्षीय बलाबल
मनपा स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजप १०, काँग्रेस ३, बहुजन समाज पार्टी २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १ सदस्य आहे. समितीमधील आठ सदस्यांचा कार्यकाळ १ एप्रिल २०२१ रोजी संपला. यात भाजपचे विद्यमान सभापती रवी आसवानी, संजय कंचर्लावार व सुभाष कासनगोट्टूवार, काँग्रेसचे २, बसपाचे २ आणि राकाँच्या एका सदस्याचा समावेश आहे. कोरोना निर्बंधामुळे दिलेली मुदतवाढही संपली आहे. या जागेवर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी कंबर कसली. भाजपमध्येही कुरघोडी सुरू झाल्याची चर्चा आहे.