‘त्या’ वाघाचा शोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 09:34 PM2018-09-09T21:34:59+5:302018-09-09T21:35:50+5:30
मागील पाच दिवसांपासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघाची भद्रावतीकरांच्या मनात भीती आहे. पण त्याला पाहण्याची उत्सुकताही आहे. त्यामुळे घटनास्थळावर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सारेच गर्दी करीत आहेत.
सचिन सरपटवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : मागील पाच दिवसांपासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघाची भद्रावतीकरांच्या मनात भीती आहे. पण त्याला पाहण्याची उत्सुकताही आहे. त्यामुळे घटनास्थळावर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सारेच गर्दी करीत आहेत. कुणी भिंतीवर, कुणी घराच्या स्लॅबवर अथवा चक्क झाडांवर चढून वाघाला पाहण्यासाठी धडपडत आहेत. अनेकांनी वाघाच्या विविध मुद्रा मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे नागरिकांना हैराण करणाऱ्या वाघाला जंगलात हाकलण्यासाठी वनविभागाचे पथक आटापिटा करीत आहेत.
वनविभागाकडून हाकलून दिल्यावरही वाघ पुन्हा त्याच ठिकाणी येवून बस्तान मांडत आहे. त्यामुळे या वाघाने शहरातील नागरिकांची झोप उडविली आहे. दोन हेक्टर परिसरात वास्तव्यास असलेल्या हा वाघ सुरक्षित जागेच्या शोधात आहे. आयुध निर्माणी येथील पिनाका प्रकल्पाच्या दिशेने जावून पुन्हा पण परत येतो. गौतमनगर परिसरातील झुडूपांमध्ये गावठी डूकरे मोठ्या संख्येने आहेत. परिणामी वाघाचा या परिसरात मुक्काम वाढत असावा, अशी चर्चा आहे. वनविभागाच्या पथकाने वाघाला हाकलून लावण्यासाठी रात्रभर गस्त घालत आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालीवर वनविभाग लक्ष ठेवून आहे. हा वाघ ताडाळी येथून सारवाही परिसरात आला होता. दरम्यान म्हातारदेवीच्या दिशेने गेला. सारवाही परिसरातून धारिवाल कंपनीची सुरक्षा भिंत, कोंढाळी तलाव, रेल्वे ट्रॅकमार्गे इंजिनिअरिंग कॉलेज जवळील नाल्याजवळ पुलाच्या सहाय्याने मोहबळा शेतात आला. तिथून पुन्हा आयुध निर्माणी परिसरात पोहोचल्याचे काही नागरिक सांगतात. तेव्हापासून हा वाघ या भागात बस्तान मांडून आहे. वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करूनही जंगलात हाकलून लावण्यास अपयश आले. दरम्यान, हा वाघ बघण्यासाठी नागरिक आटापिटा करीत आहेत.
वाघाच्या दहशतीमुळे आयुध निर्माणीने मार्ग बदलविला
वाघाल जंगलात हाकलून लावण्यासाठी वन विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पण अजुनही यश आले नाही. परिणामी, शोध मोहिमेत वारंवार अडचणी येत आहेत. दरम्यान, हा वाघ बघण्यासाठी रविवारीदेखील नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. आयुध निर्माणीच्या मार्गावरून नागरिकांची मोठी वर्दळ असते. परंतु वाघाच्या दहशतीमुळे व्यवस्थापाने या मार्गात बदल केला आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून पायी किंवा वाहनाने जाण्यासाठी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.