दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:37+5:302021-06-09T04:35:37+5:30
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या वैवाहिक जीवनात विष कालवले असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ...
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या वैवाहिक जीवनात विष कालवले असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. मार्च २०२० पासून जिल्हाभरातून कौटुंबिक हिंसाचाराच्या दोन हजार २१० तक्रारी भरोसा सेलकडे आल्या आहेत. त्यापैकी १०८४ प्रकरणात तडजोड करण्यात आली असून २२४ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली आहेत. बऱ्याच महिला आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तक्रार करण्यास धजावत नसल्याने ही संख्या बरीच मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनामुळे सर्व कुटुंब एकत्र आले. घरामध्ये ज्येष्ठांचा हस्तक्षेप वाढला. दाम्पत्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील स्पेसला निर्बंध निर्माण झाले. अनेकांचा रोजगार हिरावला. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले. मोबाईल चॅटिंगमुळे परस्परातील संशयात वाढ, अशा विविध कारणाने पती- पत्नीमध्ये घरगुती कलह निर्माण होऊन कौटुंबिक हिंसाचार वाढू लागला. मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत भरोसा सेलकडे १४५७ तर जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ७५३ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी २२४ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली. तर १०८४ प्रकरणात तडजोड करण्यात चंद्रपूर भरोसा सेलच्या पथकाला यश आले आहे.
बॉक्स
१०४८ पती-पत्नीचे भांडण सोडविले
लॉकडाऊनचा परिणाम सर्व विभागावर पडला आहे. यातून वैवाहिक जीवनसुद्धा सुटले नाही. विविध कारणातून भांडण-तंटे निर्माण झाले. वाद न सुटल्याने हे सर्व प्रकरणे भरोसा सेलकडे गेले. दोन्हीकडील बाजू समजून घेत भरोसा सेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०४८ प्रकरणात तडजोड केली. त्यामुळे एकमेकांविरुद्ध वितुष्ट निर्माण झालेले कुटुंब पुन्हा गुण्यागोंविदाने नांदू लागले.
-------
पैसा हाच कारण
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे आर्थिक तणाव वाढत आहे. त्यातून वाद निर्माण झाल्याने अनेकांनी माहेरून पैसे आण असा तगादा लावल्याच्या तक्रारी आहेत. तर काहीजणात आर्थिक विवंचनेतून वाद निर्माण झाल्याची तक्रारी आहेत.
----
मोबाईलचा सतत वापर
लॉकडाऊनमुळे मोबाईलचा वापर वाढला आहे. मोबाईलसुद्धा वादाचे मोठे कारण ठरत आहे. मोबाईल चॅटिंग, जास्त वेळ मोबाईल वापरणे, सतत फोनवर बोलणे, आदी कारणामुळे वाद निर्माण होत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर जपून करणे गरजेचे आहे.
-------
चारित्र्यावर संशय
अनेक पती-पत्नी चारित्र्यावर संशय घेत असल्याने वाद वाढत आहे. यासोबतच दारू पिऊन मारझोड करणे, सासु-सासऱ्याचा वैवाहिक जीवनात हस्तक्षेप आदी कारणांनी वैवाहिक जीवनात वाद निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
-----
कोट
प्रतिष्ठेला घाबरून अनेक महिला अन्याय सहन करतात. मात्र असे न करता भरोसा सेलकडे तक्रार करावी.
कुटुंब अत्याचार अधिनियम २००५ नुसार आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी समुपदेशनातून निपटारा करण्याचा प्रयत्न करीत असतो. बऱ्यापैकी प्रकरणात यश येते. उर्वरित प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात येतात.
-अश्विनी वाकडे, पोलीस उपनिरीक्षक भरोसा सेल, चंद्रपूर
२०२० मध्ये आलेल्या तक्रारी -
१४५७
२०२१ मध्ये आलेल्या तक्रारी - ७५३