आठ दिवसांनी उलगडणार चंद्रपूर जिल्ह्यातील हिरव्या पाण्याचे रहस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:37 PM2018-09-05T12:37:02+5:302018-09-05T12:39:04+5:30
कोरपना तालुक्यातील अमलनाला धरणातील पाण्याने धारण केलेला हिरवा रंग सर्वत्र औस्युक्याचा विषय ठरला आहे. पाणी एकाएकी हिरवे होण्यामागील कारणांचा अद्यापही उगडला झाला नाही.
आशिष देरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अमलनाला धरणातील पाण्याने धारण केलेला हिरवा रंग सर्वत्र औस्युक्याचा विषय ठरला आहे. पाणी एकाएकी हिरवे होण्यामागील कारणांचा अद्यापही उगडला झाला नाही. अशातच मंगळवारी नागपूर येथील नीरीच्या चमूने पाहणी केली. धरणातील ठिकठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. मात्र या चमूनेही खरे कारण अद्याप स्वष्ट केले नसल्यामुळे हिरव्या पाण्याचे रहस्य कायमच आहे.
अंमलनाला धरणाचे पाणी पूर्णत: हिरवे झाल्यामुळे शासनाने दखल घेत वेगवेगळ्या विभागाकडून पाण्याच्या तपासणीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे. मंगळवारी नीरीच्या चमूने अंमलनाला धरणाचे निरीक्षण करून नमुने तपासणीसाठी घेतले आहे. पाणी तपासून निष्कर्ष मिळेपर्यंत आठ दिवस लागणार आहे.
नागपूरवरून आलेल्या या चमूत डॉ. जी. के. खडसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजू वसावे, बहादुले, सिंचन विभागाचे उपअभियंता ओचावार, कोरपनाचे तहसीलदार हरीश गाडे, राजूराचे तहसीलदार रवींद्र होळी, सिंचाई विभागाचे शाखा अभियंता सय्यद अमीर अली याचां समावेश आहे. सदर चमूने जवळपास चार तास अंमलनाला धरणाची पाहणी केली. पाच ठिकाणचे वेगवेगळे नमुने तपासणीसाठी घेतले. अंमलनाला धरणाच्या आजूबाजूच्या पाण्याचे स्त्रोत बघून त्याठिकाणी काही आक्षेपार्ह आढळते काय,याची सुद्धा पाहणी केली. मात्र असे काहीही आढळले नाही.
सर्वप्रथम ‘लोकमत’ने ‘अंमलनाला धरणातील पाणी झाले हिरवे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर याकडे जिल्हा प्रशासनासह सर्वत्र खळबळ उडाली. जिल्ह्याचे पालकमंत्र सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत चौकशीचे आदेश देऊन पाणी हिरवे होण्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
यानंतर शासनाच्या विविधपातळीवर चमू या धरणाला भेट देऊन पाहणी करीत आहे. मात्र रहस्य कायमच आहे.
नीरीचे डॉ. खडसे यांच्या मते
घाबरण्याचे काहीही कारण नसून शेवाळामुळेच हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. तपासणीसाठी आतील पाणी सुद्धा घेण्यात आलेले आहे. चमूच्या माहितीनुसार आतील पाणी स्वच्छ असून शेवाळ वरती तरंगत असल्याचे दिसते. तसेच किनाऱ्यावर त्याचे जास्त प्रमाण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या शेवाळाचे अनेक प्रकार असून काही शेवाळ नुकसानकारक पण असतात. मात्र यामुळे माशांना कसल्याही प्रकारचा धोका नसल्याचे नीरीच्या चमूने स्पष्ट केले.
पाणी हिरवे होण्यामागे शेवाळ ही सूक्ष्म वनस्पती कारणीभूत आहे. परिसरातील शेतात टाकलेल्या रासायनिक खतांमधील सल्फेट व फॉस्फेट धरणाच्या पाण्यात मिसळल्याने या वनस्पतींना खाद्य मिळाले. अशातच सूर्यप्रकाशही मिळाला. यामुळे या वनस्पतीची गतीने वाढ झाली. ढगाळ वातावरणात असे झाले नसते. यामागे दुसरे कोणतेही कारण दिसत नाही. या वनस्पतीचे पाण्यात अधिक प्रमाण असेल तर पाण्यातील आॅक्सिजन कमी होतो.
- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोयायटी, चंद्रपूर.