पाणलोट समितीच्या सचिवांचे मानधन रखडले
By admin | Published: June 10, 2016 01:15 AM2016-06-10T01:15:08+5:302016-06-10T01:15:08+5:30
कृषी विभाग आणि गावकऱ्यांंचा दुवा, अशी ओळख असलेल्या पाणलोट समितीच्या सचिवांना गेल्या १४ महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही.
१४ महिन्यांपासून उपासमार : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
वरोरा : कृषी विभाग आणि गावकऱ्यांंचा दुवा, अशी ओळख असलेल्या पाणलोट समितीच्या सचिवांना गेल्या १४ महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांंवर उपासमारीची वेळ आली आहे.
पाणलोट समितीच्या सचिवांना मानधनासाठी आलेला निधी दुसऱ्याच कामात खर्च करण्यात येत असल्याची चर्चा आहे. मानधन मिळाले नसल्याने कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांच्या बांद्यावर पोहोचवून त्याची अंमलबजावणी करणे, गाव आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय साधण्याचे काम एकात्मिक पाणलोट विकास समितीचे सचिव करतात.
वरोरा तालुक्यातील राळेगाव, चारगाव (बु.), वायगाव आणि अर्जूनी या गावात पाणलोट समित्या आहेत. २०११ पासून या चारही गावात पाणलोट समित्यांचे चार सचिव कार्यरत आहेत. सचिवाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांना पटवून गावविकास आणि शेतीविकासाचे काम केले जाते. गाव आणि कृषी असा समन्वय साधला जातो. गावात केलेल्या कामाची देखरेख व मोजमापही केले जाते. मात्र हे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या सचिवांना २०१५ पासून १४ महिन्यांचे मानधन देण्यात आले नाही.
पाणलोट समितीच्या सचिवांनी आतापर्यंत चारवेळा तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन देण्याची विनंती केली. मात्र त्याचा काहीच फायदा झालेला नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ६ मे रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र पाठवून सचिवांचे मानधन अदा करावे, अशा आशयाचे पत्र पाठविले. मात्र महिनाभराचा कालावधी लोटूनही सचिवांचे मानधन अदा करण्यात आले नाही. (तालुका प्रतिनिधी)