सचिवाने केली रकमेची अफरातफर

By admin | Published: July 9, 2015 12:52 AM2015-07-09T00:52:59+5:302015-07-09T00:52:59+5:30

येथील विविध कार्यकारी संस्थेच्या सचिवांनी सभासद रकमेची अफरातफर केली असल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले नाही.

The Secretary said the amount of money lapsed | सचिवाने केली रकमेची अफरातफर

सचिवाने केली रकमेची अफरातफर

Next

शेतकरी आर्थिक अडचणीत : शंकरपूर सोसायटीचे अजूनही कर्ज वाटप नाही
शंकरपूर : येथील विविध कार्यकारी संस्थेच्या सचिवांनी सभासद रकमेची अफरातफर केली असल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्या सचिवावर फौजदारी कार्यवाही करून निलंबित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शंकरपूर विविध कार्यकारी संस्थेत १२४ सभासद आहेत. त्यापैकी ११० सदस्यांना कर्ज वाटप करायचे आहे. परंतु या संस्थेचे सचिव वाय.एम. सिडाम यांनी सभासदाकडून मागील वर्षीचे कर्जभरणा संस्थेकडे केला. तशी रितसर पावती सभासदांना देण्यात आली. परंतु संस्थेचे सचिव सिडाम यांनी सभासदांनी भरलेले तीन लाख ४५ हजार रुपये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरलेले नाही. ती रक्कम त्यांनी स्वत:जवळच ठेवली आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना अजूनही कर्ज वाटप होऊ शकले नाही.
शासनाच्या निर्णयानुसार ३१ मार्च पूर्वी कर्ज भरल्यास पुन्हा नव्याने बिनव्याजी कर्ज उचलता येते. नवीन आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून कर्ज वाटप करण्यात येते. १५ मेपर्यंत पहिल्या हप्त्याचे वाटप करण्याचे शासनाचे आदेश आहे. परंतु सचिवांनी या पैशाची अफरातफर केल्याने सभासदांना कर्ज वेळेवर मिळू शकले नाही. या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. प्रशासक म्हणून गावंडे यांची नेमणूक करण्यात आली. सभासद नवीन कर्जासाठी बँकेकडे येत असल्याने गावंडे यांनी चौकशी केली असता रकमेची अफरातफर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. यासंदर्भात प्रशासक यांनी चंद्रपूर जिल्हा सुपरव्हिजन सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु साडेतीन लाख रुपयांची अफरातफर होऊन अजूनही सचिवांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन हे प्रकरण दडपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हंगामाला सुरुवात झाली आहे. मागील वर्षीही शेती पिकली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे साहित्य गहाण ठेवून व उसनवारी करून पैशे काढले व ते पैसे सचिवाकडे दिले. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने व संस्थेचे वाटप लवकर होत असल्याने शेतकऱ्यांनी ही रकम जमा केली. आधीच शेतकरी हतबल झाला असून अस्मानी संकटाला तोंड देत आहे. यातच त्यांच्या घामाच्या पैशाची अफरातफर केल्याने शेतकऱ्यात निराशेचे वातावरण तयार झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: The Secretary said the amount of money lapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.