सहा महिन्यांपासून सुरक्षारक्षकांना वेतनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:43 AM2020-12-12T04:43:10+5:302020-12-12T04:43:10+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे वेतन मागील सहा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे ...
चंद्रपूर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे वेतन मागील सहा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे थकीत वेतन त्वरीत देण्यात यावे या मागण्यांचे निवेदन सुरक्षारक्षकांनी कामगार आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात मागील दीड वर्षांपासून महाराष्ट्र शासन सुरक्षा मंडळतर्फे सेवा देण्याचे काम सुरक्षा रक्षक कामगार करीत आहेत. कोरोना महामारीत या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली. मात्र त्यांचे सहा ते दहा महिन्याचे वेतन थकीत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित वेतन देण्यात यावे, ११ महिन्यापूर्वी सहाय्यक कामगार आयुक्तांनी १० सुरक्षा रक्षक कामगारांचे विशेष बाब म्हणून मंजूरीकरिता मुख्य कामगार आयुक्ताकडे पावठलेले प्रस्ताव मंजूर करावे, सर्व सुरक्षा रक्षकांना बोनस इतर सुविधा द्यावी, युनिफॉर्म व इतर कामाच्या वेळी लागत असलेले साहित्य द्यावे, १० ते २० वर्षांपासून सेवा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना कोणतीही चूक नसताना २०१९ मध्ये सेवेतून कमी करण्यात आले. त्यांना पूर्ववत सेवेत घ्यावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सात दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा न. प. सभापती छोटु शेख यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.