बापरे! सव्वा लाख नागरिकांची सुरक्षा केवळ १०० पोलिसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:01 PM2024-09-13T12:01:01+5:302024-09-13T12:04:20+5:30
Chandrapur : अपुऱ्या मनुष्यबळावर बल्लारपूर ठाण्याचा कारभार
मंगल जीवने
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर: येथील पोलिस ठाण्यांतर्गत २२ गावांमधील सुमारे १ लाख २१ हजार नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केवळ १०० पोलिस अधिकारी, कर्मचारी सांभाळत आहेत. यामुळे सुरक्षात्मक उपाययोजनांमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, शहर व गावांमध्ये सुरू असलेले जुगार, मटका, अवैध दारू, गौण खनिजांची वाहतूक रोखण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
सध्या ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक, ३ पोलिस उपनिरीक्षक व ९० च्या जवळपास पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येसाठी ही संख्या अपुरी आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इतर अडचणींचा सामना पोलिस ठाण्याला करावा लागत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहराच्या महत्त्वपूर्ण चौकातून ट्राफिक पोलिस दिसेनासे झाले आहेत. पोलिस चौक्या बंद आहेत, त्या उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्रीची गस्त कमी प्रमाणात होते. पोलिसांची अपुरी संख्या असल्यामुळे पोलिसांना ठाण्यात जास्त वेळ द्यावा लागतो. बल्लारपूर पोलिस ठाण्यांतर्गत चार बिट, दोन आरोग्य व ग्रामीण रुग्णालय, सहा महापुरुषांचे पुतळे, १८ मशीद, १३ चर्च व ३१ मंदिरांचा समावेश आहे. त्याचबरोबर ठाण्यापासून २८ किलोमीटर एवढ्या लांब अंतरावर असलेल्या हद्दीत २२ गावे आहेत. या गावांतील १ लाख २० हजार २६९ लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी जवळपास १०० पोलिस कर्मचारी पाहतात. उत्सवासाठी, गस्त घालण्यासाठी हे कर्मचारी कमी पडतात.
असे आहे पोलिस ठाण्यातील मनुष्यबळ
पोलिस निरीक्षक १, सपोनि ३, पोउपनि ३. चालक ४, बिट जमादार ४, बिट मदतनीस ४, मोहरील १, हजेरी १, तसेच क्राइम, गुप्त वार्ता व वायरलेस १, उपविभागीय कार्यालय, राजुरा, कोर्ट-३.
आणखी ४३ कर्मचाऱ्यांची गरज
अनेक वर्षापासून या पोलिस ठाण्याला लोकसंख्येनुसार मनुष्यबळाचा कोटा दिलेला आहे. तो अद्यापही कायम आहे. वास्तविक पाहता आजघडीला लोकसंख्या वाढली आहे. त्यानुसार कर्मचारी संख्या वाढणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. सध्या तरी ४३ च्या वर पोलिस कर्मचारी गरजेचे आहेत.
कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा तनाव
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपुऱ्या मनुष्यबळामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असून, त्याचा परिणाम शरीर प्रकृतीवर होत आहे. गेल्या एक वर्षापासून वरिष्ठांकडे पोलिस कर्मचारी वाढवून देण्याची मागणी होत आहे. परंतु, वाढीव पोलिस कर्मचारी अजूनपर्यंत मिळाले नाहीत.