सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर, कामगारांना धोका
By admin | Published: October 5, 2016 12:55 AM2016-10-05T00:55:53+5:302016-10-05T00:55:53+5:30
वेकोलिच्या कोळसा खाणीत सुरक्षेअभावी कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सुरक्षा सप्ताह केवळ नावापूरताच : वेकोलि व्यवस्थापनाचे दुर्लक्ष
प्रकाश काळे गोवरी
वेकोलिच्या कोळसा खाणीत सुरक्षेअभावी कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वेकोलित राबविण्यात येणारा सरक्षा सप्ताह केवळ नावापूरताच असून वेकोलि सुरक्षा व्यवस्थापन कामगारांच्या जीवीताची कोणतीच काळजी घेत नाही. त्यामुळे वेकोलित कामगारांच्या अपघाताच्या घटनेत वाढ झाली असून वेकोलिची सुरक्षा व्यवस्थाच वाऱ्यावर दिसून येते.
राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या भूमिगत व खुल्या कोळसा खाणी मोठ्या प्रमाणात आहे. या कोळसा खाणी देशाच्या नकाशावर जिल्ह्याची मान उंचावणाऱ्या असल्या तरी येथील कामगारांच्या व जनतेच्या जीवाशी खेळ करीत आहेत. एखादा परिसर औद्योगिक क्षेत्राने नटला तर त्या क्षेत्राचा विकास होणे अपेक्षीत आहे, आणि ते तितकेच खरे आहे. परंतु वेकोलि प्रशासनाचे नियोजनशुन्य धोरण आणि सुरक्षीततेबाबतची उदासीनता कामगार व परिसरातील नागरिकांसाठी जीवघेणी ठरणारी आहे.
राजुरा तालुक्यात गोवरी, पोवनी, सास्ती, गोवरी डीप या कोळसा खाणी आहे. नव्या कोळसा खाणींसाठी साखरी परिसरात शेतकऱ्यांकडून जमिनीचे अधिग्रहन केले आहे. वेकोलि प्रशासन सुरक्षीततेची कोणतीच काळजी घेत नाही. त्यामुळे वेकोलिची औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वेकोलिच्या कोळसा खाणीत सर्व्हेआॅफ झालेल्या जुन्या मशिन, डंपर चालविल्या जातात. मात्र याच मशिनमुळे कामगारांच्या जीवाला धोका होऊ शकतो, याचा विचार सुरक्षा व्यवस्थापन कधीच करीत नाही. त्यामुळे वेकोलित वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे. मात्र यावर वेकोलिचे जबाबदार अधिकारी विचारमंथन करायला तयार नाही. कोळसा उत्खननासाठी कोळसा खाणीत वेळोवेळी शक्तीशाली ब्लॉस्टिंग केली जाते. वेकोलिने ब्लॉस्टिंगची तिव्रता वाढविल्याने कामगारांना तेवढीच सुरक्षा देणे आवश्यक असते. मात्र वेकोलि व्यवस्थापन सुरक्षा सप्ताह नावापूरता साजरा करुन कामगार सुरक्षीत असल्याचा आव आणला जातो. परंतु, वेकोलिची सुरक्षा व्यवस्थाच ढेपाळली आहे.
वेकोलिच्या डेंजरझोन परिसरात कमालीची सुरक्षितात पाळणे आवश्यक असून या ठिकाणी २४ तास सुरक्षा असणे गरजेचे आहे. डेंजरझोन परीसर सुरक्षीत नसला तर कोणत्याही क्षणी एखादी अनुचित दुर्घटना घडू शकते. याकडे वेकोलिच्या सुरक्षा व्यवस्थापनाने लक्ष देणे आवश्यक आहे. वेकोलि वर्षाकाठी करोडो रुपयाचा नफा कमविते. परंतु वेकोलित कामगारांच्या सुरक्षीततेची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे वेकोलिची सुरक्षा व्यवस्थाच वाऱ्यावर असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सुरक्षिततेचा केवळ
गाजावाजा
वेकोलित कामगारांच्या सुरक्षीततेचा गाजावाजा करण्यासाठी मोठे फलक लावण्यात आले आहे. मात्र परिस्थिती प्रत्यक्षात वेगळी आहे. या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षीततेसाठी कोणतीच काळजी घेतली जात नाही.