महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात !

By admin | Published: February 21, 2016 12:35 AM2016-02-21T00:35:50+5:302016-02-21T00:35:50+5:30

वनविकास महामंडळात विविध पदावर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना वेळीअवेळी , रात्री-बेरात्री बोलावणे ...

Security of women workers threatened! | महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात !

महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात !

Next

वनविकास महामंडळील प्रकार : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे महिलांची तक्रार
कोठारी : वनविकास महामंडळात विविध पदावर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना वेळीअवेळी , रात्री-बेरात्री बोलावणे किंवा त्यांच्या निवासात प्रवेश करून त्यांच्यावर बळजबरी करण्याच्या प्रकाराने येथे कार्यरत वनरक्षकासह अन्य महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीने महिला कर्मचारी प्रचंड दबावात व दहशतीत वावरत आहेत. याबाबत महिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही करून आपबिती कथन केली आहे.
वनविकास महामंडळात वनरक्षक पदावर अनेक महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात अनेक युवतींची भरती आहे. त्यांना क्षेत्रीय कामावर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे जावे लागते. दिवसभर जंगलातील कामे करावी लागतात. जंगल, जंगली प्राणी व क्षेत्रीय कामाची जबाबदारी एका चौकीदाराच्या सहकार्याने पार पाडावी लागते. अशातच वन अधिकारी आपल्या अधिकारांचा वापर करीत महिला वनरक्षकास एकटीला वाहनात बसवून जंगलात घेऊन जातात तर कधी स्वत:चा बडेजाव करण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा वापर करतात. कधी कधी दारुच्या नशेत धुंद झालेले अधिकारी मध्यरात्री महिला कर्मचाऱ्यांच्या निवासात प्रवेश करतात. त्यांच्याशी असभ्य वर्तन करुन लैगिंक छळ करण्याचा प्रयत्न करतात. सदर प्रकाराची तोंडी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यास कर्मचाऱ्यास तोंड बंद ठेवण्याची ताकीद दिली जाते. अधिकारी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर महिला कर्मचाऱ्यांसोबत करीत त्यांचे लैगिक शोषण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याविरोधात गेल्यास नोकरीला मुकावे लागते. काही विवाहित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना छेडछाड करण्यात विवाहित पुरुष कर्मचारीही मागे नाहीत.
या प्रकाराची तक्रार प्रादेशिक व्यवस्थापकाकडे करण्यात आली असून त्या महिला कर्मचाऱ्यांनी आपबिती कथन केली व गैरवर्तणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Security of women workers threatened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.