खरिपावर बियाण्यांचा आघात
By admin | Published: May 12, 2014 11:26 PM2014-05-12T23:26:45+5:302014-05-12T23:26:45+5:30
मागील दोन वर्षामधील रोगराई, अतवृष्टी, महापूर यांचा आघात सहन करून बळीराजा आता पुन्हा उसणे बळ एकवटत मातीत रमायला लागला आहे.
रवी जवळे - चंद्रपूर मागील दोन वर्षामधील रोगराई, अतवृष्टी, महापूर यांचा आघात सहन करून बळीराजा आता पुन्हा उसणे बळ एकवटत मातीत रमायला लागला आहे. मात्र या बळीदादांच्या खरीपांवर आता बियाण्यांचे संकट घोंगावत आहे. हा नवा आघात त्यांना प्रारंभीच सहन करावा लागणार आहे. मागील वर्षीच्या अतवृष्टीत महाबीजचे सोयाबीन प्लांट उद्ध्वस्त झाल्याने सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई जाणवणार आहे. शेतकर्यांच्या सोयाबीनला चक्क अंकुर फुटल्यामुळे त्यांच्याही हाती बियाणे नाही. त्यामुळे बियाणे आणायचे कुठून, या जटील प्रश्नाची उकल कृषी विभागासोबत शेतकर्यांनाही करावी लागणार आहे. मागील वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये अतवृष्टी झाली. यात शेतकर्यांच्या अनेकदा पेरण्या वाहून गेल्या. काही शेतकर्यांना वेळ निघून गेल्यामुळे सोयाबीनच्या पेरण्या करताच आल्या नाही. काही शेतकर्यांच्या पेरण्या तग धरून राहिल्या. मात्र सोयाबीन हाती येत असताना पुन्हा पाऊस आला. त्यानंतर कापणी सुरू असताना पुन्हा एक महिना संततधार पाऊस बरसल्याने सोयाबीनचा दाणा सुकू शकला नाही. त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या सोयाबीनला अंकूर फुटले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील जवळजवळ ९0 टक्के शेतकर्यांजवळ सोयाबीनचे बियाणे शिल्लक नाही. ज्या शेतकर्यांनी विलंबाने पेरणी केली किंवा ज्यांनी रबी हंगामात सोयाबीन पेरला, त्यांच्याजवळ बियाणे म्हणून वापरायला सोयाबीन शिल्लक असेलही; मात्र असे शेतकरी १0 टक्केच आहेत. खास सोयाबीनच्या बियाणांसाठी शासनाच्या वतीने तयार करण्यात येत असलेले महाबीजचे प्लांटही अतवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे या ठिकाणीही सोयाबीन बियाणांची प्रचंड टंचाई आहे. महाबीजचेच प्लांट उद्ध्वस्त झाल्याने ही टंचाई राज्यभरच जाणवणार आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनबाबत खुद्द राज्याचा कृषी विभागाच चिंतेत आहे. सध्या खरिपाची तयारी सुरू आहे. लग्नसराईला बगल देत शेतकर्यांचीही शेतात लगबग सुरू झाली आहे. मात्र बियाण्यांबाबत कृषी विभागाच्याच हालचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत. दुसरीकडे व्यापार्यांनी मार्केटमध्ये सोयाबीनचे बियाणे उपलब्ध केले आहे. मात्र बियाणांच्या किमती शेतकर्यांच्या फाटक्या झोळीला पुन्हा फाडणार्या आहेत. मागील वर्षी एक एकरला पुरेशी असलेली ३0 किलोची बॅग १५00 ते १८00 रुपयापर्यंत विकण्यात आली होती. तीच बॅग यावर्षी प्रारंभीच २२00 ते २८00 रुपयापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रत्यक्षात पेरण्या होईपर्यंत सोयाबीन बियाणे प्रति बॅग तब्बल साडेतीन हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सोयाबीन बियाणांच्या किमती निर्धारित केल्या नसल्यामुळे यंदा शेतकर्यांची लूट निश्चित आहे.एवढे महाग बियाणे असले तरी त्यात उगवण क्षमता असेलच याची गॅरंटीही नाही. विशेष म्हणजे, राज्यातच अतवृष्टी झाल्यामुळे हे बियाणे आंध्र प्रदेशातून आणले जात असल्याची माहिती आहे.