ढगांच्या लपंडावात बियाणे मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:18 PM2018-06-24T23:18:27+5:302018-06-24T23:18:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूर (स्टे.) : जिल्ह्यावर प्रसन्न होत वरूणराजाने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलग चार दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग आनंदी झाला. लगेचच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. मात्र सवयीप्रमाणे लहरीबाबा निसर्गाने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. तब्बल पंधरा दिवसांपासून लुप्त झालेल्या पावसामुळे लक्षावधी रूपयांचे हजारो शेतकऱ्यांच्या बियाणांची माती होण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
साºयांच्याच आसूड शिरावर घेऊन जगणाऱ्या शेतकऱ्यांवर आता निसर्गाने आसूड ओढविला आहे. काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असली तरी पेरलेले बियाणे मरण्याच्या तयारीत आहे. यामुळे लाख मोलाचे बियाणे मातीत घालून मातीमोल होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. होत्याचे नव्हते करून, बँकासह खासगी सावकाराचे भरमसाठ व्याजाचे कर्ज घेऊन, घरातल्या वस्तू विकून, वेळप्रसंगी स्वत:ला गहाण ठेऊन शेतकरी शेती करतो. मात्र ही शेती पुर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याने निसर्ग पावला तरच पिकते अन्यथा हातापायाचे सारे काढून अश्रुंचा लोंढा डोळ्यातून ढाळल्याशिवाय पर्याय नसतो. यंदा चांगले पिक होईल, मुलबाळांचे शिक्षण होईल मुलींचे लग्न होईल व इतर कामे पार पडतील या आशेने शेतकऱ्यांनी लाखमोलाचे बियाणे लावले. परंतू पावसाने दगाबाजी केल्याने सर्वच पिके मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. सोयाबीन, कापूस व इतर पिकाच्या बियाण्यांचे अंकूर निघण्यापूर्वीच मातीत मरत आहे. एक दोन दिवसात पाऊस जर आला नाही तर सर्वच पिके हातचे जाण्याची शक्यता दिसून येत आहे.
यंदा हवामान खात्याने मान्सून वेळेवर होईल, पाऊस भरपूर होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात होता. मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसावर भरवसा ठेऊन पेरलेल्या पिकांची सध्या माती होत आहे. काही बियाणे जमिनीच्या वर येण्याआधीच गडप झाले आहे तर काही बियाणे जमिनीच्या वर येउन पाण्याअभावी माना टाकत आहे. बियाणे व खते यांच्या अतोनात भाव वाढीमुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला असून दुबार पेरणीसाठी आता काय करावे या विवंचनेत सापडला आहे. मोजक्या पैशात प्रपंच चालवून शेतात मर-मर मरूनही निसर्ग कोपल्याने आर्थिक कंबरडे माडले आहे. तोंडात केवळ आश्वासनाच्या शब्दांची मालिका जोपासणाºया शासनाकडून शेतकºयांना दुबार पेरणीसाठी काही मदत होईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुन्हा नापिकी झाल्यास शेतकरी कोलमडून पडेल.
धान उत्पादकही संकटात
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात पावसाची सुरवात दमदार झाल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून अनेक प्रजातीचे संशोधित महागडे बियाणे घेऊन शेतात धानाचे पऱ्हे टाकले. दहा बारा दिवस होऊ न गेले अजूनपर्यंत पावसाने हजेरी न लावल्याने पाण्याविना पऱ्हे करपत आहेत.
मागील वर्षी तुडतुडा रोगाने धानाच्या पिकात मोठ्या प्रमाणात घट झाली. अनेक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. त्यासाठी शेतकऱ्यांनी संशोधित बियाणे रोगावर प्रतिकार करणारे वाण विकत घेतले. पऱ्हे टाकले आहेत. सुरवातीला जर दुबार धानपऱ्हे टाकण्याचे संकट येत असेल तर शेतकऱ्यांची काय अवस्था होईल, याची जाणीव सर्वांना आहे. परिस्थितीची जाण ठेऊ न धानउत्पादक शेतकरी वरूणराजाकडे बघत पावसाची प्रतीक्षा करीत आहे. बल्लारपूर तालुक्यातील कळमना, आमडी, पळसगाव, कवडजई, किन्ही, इटोली, मानोरा इत्यादी गावातील शिवारातील धान पºयाची स्थिती पाण्याविना करपण्याच्या मार्गावर आहे.
मृगाच्या पहिल्याच पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांनी लागवड केली. मात्र लाखमोलाचे बियाणे नष्ट होत आहे. बियाण्यांची कृत्रिम टंचाई व वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांचे पहिलेच कंबरडे मोडले आहे. काय करावे काही समजत नाही.
-सचिन पिपरे,
शेतकरी, विरूर स्टे.