रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:27 AM2021-05-24T04:27:15+5:302021-05-24T04:27:15+5:30
वरोरा : एकाच मालकाचे टिप्पर व ट्रॅक्टर रेती भरून रस्त्याने जात असताना शासकीय वाहन आडवे आले. त्यामुळे टिप्पर व ...
वरोरा : एकाच मालकाचे टिप्पर व ट्रॅक्टर रेती भरून रस्त्याने जात असताना शासकीय वाहन आडवे आले. त्यामुळे टिप्पर व ट्रॅक्टर थांबले. ट्रॅक्टरचालकाला वाटले की रेती भरलेला टिप्पर अधिकाऱ्यांनी पकडला व लागलीच त्याने याची माहिती मालकाला दिली. यानंतर मालक लगबगीने दुचाकीने तिथे आले आणि चक्कर येऊन पडले. नागरिक जमा झाल्याने त्या वाहनातील शासकीय अधिकाऱ्यांनी रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त केला.
नागपूर - चंद्रपूर महामार्गावरून वरोरा शहराकडे रेती भरलेले टिप्पर व ट्रॅक्टर एकामागे एक येत होते. यावेळी दुभाजकावर शासकीय वाहन वळण घेत असल्याने टिप्पर व ट्रॅक्टर थांबले. ट्रॅक्टर चालकाला वाटले की, भरलेले टिप्पर शासकीय अधिकाऱ्यांनी पकडले. त्यामुळे ट्रॅक्टरचालकाने मालकाला टिप्पर पकडल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली. त्यामुळे लगबगीने मालक दुचाकीने घटनास्थळावर पोहोचले व तिथेच चक्कर येऊन खाली पडल्याने नागरिक पडलेल्या मालकाला उचलण्याकरिता धावले. या गोंधळात टिप्पर निघून गेले व रेती भरलेला ट्रॅक्टर थांबून राहिला. शासकीय अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरच्या परवान्याची तपासणी केली असता, तो जुना असल्याचे दिसले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने ट्रॅक्टर जप्त करून आपल्या कार्यालयाच्या पटांगणात लावला. ट्रॅक्टरचे मालक चक्कर येऊन पडले नसते तर ट्रॅक्टरची जप्ती झालीच नसती, अशी चर्चा आता होत आहे.