जुनगाव ग्रामपंचायत शिपाई पदाची निवड नियमबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:28 AM2021-07-27T04:28:49+5:302021-07-27T04:28:49+5:30
पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव ग्रामपंचायतीने शिपाई पद भरतीसाठी जाहीरनामा काढून २१ ते २८ जून २०२१पर्यंत अर्ज स्वीकृतीची तारीख ...
पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव ग्रामपंचायतीने शिपाई पद भरतीसाठी जाहीरनामा काढून २१ ते २८ जून २०२१पर्यंत अर्ज स्वीकृतीची तारीख निश्चित केली होती. गावातील बेरोजगार व गरीब कुटुंबातील तरुणांनी अर्ज दाखल केले होते. ३० जून रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीत सर्व अर्जदार पात्र ठरले होते. परंतु ग्रामपंचायतीने कुठलीही लेखी किंवा तोंडी परीक्षा न घेता भारत खुशाल पाल याला पात्र ठरवून निवड केली. यावर उर्वरित पात्र अर्जदारांनी आक्षेप घेत संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चतुर्थ श्रेणी "ड" ची निवड करत असताना प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेणे अनिवार्य होते. ५ ऑक्टोबर २०१५च्या शासन निर्णयात तशी तरतूद आहे. परंतु जुनगाव ग्रामपंचायतीने शासन निर्णयाला बगल देत भारत खुशाल पाल याची केलेली निवड शासकीय नियमाला धरून नसल्याचे तक्रारीत त्यांचे म्हणणे आहे.
शासकीय परिपत्रकाच्या नियमाला अधीन राहून सदर पदाची निवड करावी, अशी मागणी शुभम रघुनाथ पाल, महेश भोजराज पाल, प्रदीप वामन मडावी, आकाश संतोष चुधरी, मयुर गुरुदास चौधरी, सुरज सुधाकर पोरटे आणि कृष्ण देव पांडुरंग पाल यांनी केली आहे.