रेशन दुकान मिळाले बचत गटाला, चालवतो वेगळाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:31 AM2021-08-12T04:31:42+5:302021-08-12T04:31:42+5:30
बचत गटानेच दुकान चालवण्याची गावकऱ्यांची मागणी मूल : तालुक्यातील बेंबाळ येथे रेशनची दोन दुकाने आहेत. प्रशासनाने ही रेशन दुकाने ...
बचत गटानेच दुकान चालवण्याची गावकऱ्यांची मागणी
मूल : तालुक्यातील बेंबाळ येथे रेशनची दोन दुकाने आहेत. प्रशासनाने ही रेशन दुकाने महिला बचत गटांना चालवण्यास दिली आहेत. परंतु महिला बचत गट रेशन दुकान चालवित नसून, एका विशिष्ट व्यक्तीकडे दुकान चालवण्यास देण्यात आले आहे.
या व्यक्तीने एकाच ठिकाणाहून रेशन वाटप सुरू केले आहे. बचत गटाने वेगवेगळ्या ठिकाणी रेशन दुकान चालवावे, अशी मागणी बेंबाळ येथील नागरिकांनी केली आहे.
मूल तालुक्यातील बेंबाळ येथील रेशन मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, एकाच दुकानात धान्य वाटप होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याने गावामध्ये दोन दुकानातून वाटप करणे गरजेचे आहे. परंतु एकाच ठिकाणी धान्य वाटप केल्याने ग्राहकांना दोन दोन दिवस अन्नधान्यासाठी ताटकळत बसावे लागते. महिला बचत गटांना रेशन दुकानाचा परवाना देण्यात आलेला आहे. त्याच बचत गटांनी रेशन दुकान चालवावे. दोन वेगळ्या दुकानात रेशन वाटप करण्याचे प्रशासनाने तत्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणी प्रशासनाने तत्काळ पूर्ण करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देताना दीपक वाढई, प्रशांत उराडे, पवन नीलमवार, मधुकर उराडे, चांगदेव केमेकार, किशोर पगडपल्लीवार, विकास वाळके, दिवाकर कडसकर, रामदास कुसराम, कवडू गदेकार, रंजित गेडाम, सुहास वाढई, सुनील वाढई उपस्थित होते.