आदिवासी बांधवांचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:33 PM2018-04-08T23:33:37+5:302018-04-08T23:33:37+5:30
शहरात वीर बाबुराव शेडमाके व महाराणी दुर्गावती यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, तसेच बीएसएनल चौकाला भगवान बिरसा मुंडा असे नाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिजन चेतनेला जागर संघटनेच्या वतीने अनेकदा आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात वीर बाबुराव शेडमाके व महाराणी दुर्गावती यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, तसेच बीएसएनल चौकाला भगवान बिरसा मुंडा असे नाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिजन चेतनेला जागर संघटनेच्या वतीने अनेकदा आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र अजूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शहरात स्मारक उभारावे, अन्यथा १ जुलैला सायंकाळी ६ वाजता शहीद बाबूराव शेडमाके चौकात आत्मदहन करण्याचा इशारा अशोक तुमराम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
चंद्रपूर शहराला १४०० ते १५०० वर्षांचा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यांसाठी आदिवासी विरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. राजे भीम खांडक्या बल्लाळशहा, राजे निळकंठशहा, राजे बिरशहा यांच्या पराक्रमांची गाथा इथल्या मातीत रूजली आहे. मात्र चंद्रपुरात एकही विरांचा पुतळा किंवा स्मारक नाही. त्यामुळे जेल परिसरात स्वातंत्र्यवीर शहिद बाबुराव शेडमाके यांचे स्मारक उभारावे, गीरनार चौकात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अंचलेश्वर गेट परिसरात महाराणी हिराई यांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, बल्लारपूर बायपास रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील चौकात महाराणी दुर्गावती यांचा पुतळा उभारावा, जटपुरा गेट परिसरातील आतल्या बाजूस राजे भीम बल्लारळशहा (खांडक्या) यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा, बी.एस.एन.एल. चौक, रेल्वे स्टेशन चौकास भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देऊन पुर्णाकृती पुतळा उभारावा, मातानगर परिसरातील गोंडकालीन मुर्त्यांचे जतन व संवर्धन करून त्याच परिसरात आदिवासी संस्कृतीचे अध्यासन निर्माण करून पुर्णवेळ चौकीदाराची नियुक्ती करण्यात यावी, रामबाग नर्सरी, मुल रोडच्या मागील मोकळी जागा आदिवासी समाज भवनासाठी व अध्यासनासाठी देण्यात यावी, बल्लारपूर येथील राजे भीम बल्लाळशहा व राजे निळकंठशहा यांची समाधी स्थळे जतन करून त्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, या मागण्यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे १ जुलेच्या आत या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा शहीद बाबुराव शेडमाके चौकात आत्मदहन करण्याचा इशारा अशोक तुमराव यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देणाºया शिष्टमंडळात राजेंद्र धुर्वे, जमुना तुमराम, जीनेश कुळमेथे, कमलेश आत्राम, संदीप गव्हारे, बाबुराव जुमनाके, गणेश इसनकर आदी उपस्थित होते.