स्व. कन्नमवारजी, आम्हाला माफ करा..!

By admin | Published: January 14, 2016 01:24 AM2016-01-14T01:24:54+5:302016-01-14T01:37:14+5:30

ज्या मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी आपली संपूर्ण हयात अखील समाजासाठी घालविली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ...

Self Kannamvarji, we are sorry ..! | स्व. कन्नमवारजी, आम्हाला माफ करा..!

स्व. कन्नमवारजी, आम्हाला माफ करा..!

Next

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर
ज्या मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी आपली संपूर्ण हयात अखील समाजासाठी घालविली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत: कारागृह आणि हालअपेष्टा भोगून इतिहासात स्वत:चे नाव कोंदले, स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्रिपद भूषविले, सह्याद्रीने हिमालयाला साद घातली आणि हिमालय धावून गेला असा सन्माननीय उल्लेख ज्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल होतो. त्या महाराष्ट्रभूषण यशवंतराव चव्हाण यांच्या हाकेला ओ देत हा विदर्भपूत्र धावून गेला. त्या दादासाहेबांचे कार्य मोठे असले तरी आम्ही ते ओळखू शकलो नाही. माफ करा दादासाहेब...
दादासाहेबांच्या कार्याची जाणीव चंद्रपूरकरांना सदोदित व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हा परिषदेने २४ नोव्हेंबर १९७० मध्ये वसंत भवन समोर पुतळा उभारला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते आणि तत्कालीन ग्राम विकास मंत्री नरेंद्र तिडके यांच्या उपस्थितीत त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. पण दुर्देवाने तोच पुतळा आज कचऱ्यात आणि झुडूपात उभा आहे. माफ करा मा.सा. साहेब, आम्ही आपणास ओळखू शकलो नाही.
हा देश इंग्रजांच्या तावडीत होता, परसत्तेच्या आक्रमणाखाली सारी जनता पिचून चालली होती. दिल्ली, मुंबईत काय घडत आहे हे टोकावर राहणाऱ्या चंद्रपुरातील जनतेला कळत नव्हते, तेव्हा आपणच चंद्रपुरातील गांधी चौकामध्ये रोज फळयावर घटनांच्या हेडलाईन्स आणि माहिती लिहून जनजागरणाचे कार्य केले. काँग्रेस भवनामध्ये कितीतरी वेळा रात्र रात्र जागून कार्यकर्त्यांंच्या बैठका घेतल्या. झोपायचीही सोय नसायची, तेथीलच बेंचवर अंगाचे मुळकुटे करून रात्रीची झोप घेतली, सकाळी लवकर उठून कामाला लागता यावे म्हणून ! इंग्रज सत्तेविरूद्ध संघटन उभारले. काँग्रेसच्या संघटन बांधणित मोलाची भूमिका बजावली. उत्तम संघटक, कार्यकर्ता आणि समाजसेवक कसा असावा, याचा परिपाठ आपण आपल्या कृतीतून उतरविला.
दादासाहेब, आपल्यासारख्या थोरामोठ्यांच्या त्यागातून आणि कठोर परिश्रमातूनच आम्हाला सत्तेची फळे चाखायला मिळत आहेत. स्वातंत्र्यासाठी आपण खस्ता खल्ल्या म्हणून आम्ही सत्तेची पदे उपभोगत आहोत. पण माफ करा, दादासाहेब, आम्ही आपला त्याग विसरलो.
चंद्रपुरातील आपला पुतळा कशा अवस्थेत उभा आहे, हे कदाचित आपण वरून बघत असालही. त्याबद्दल आपणास दु:खही होत असेल. पण माफ करा दादासाहेब. आपला पुतळा कुणाच्या कक्षेत येतो हे आम्हाला आधी ठरवू द्या, नंतरच स्वच्छतेचे काय ते बघू. पुतळा जिल्हा परिषदेने उभारला. जबाबदारी त्यांची आहे की, महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याने मनपाची आहे, हा वाद आधी दूर होऊ द्या. पत्र आल्याशिवाय आणि विचारल्याशिवाय स्वच्छता करायची नाही, असा महापौरांचा दंडक आहे, बरे का. अर्ज द्याल तर आपला ले-आऊटही महापौर स्वच्छ करून देणार आहेत. पण अर्ज लागेलच. दादासाहेब, आता आपणच पृथ्वीवर या आणि महानगर पालिकेत जावून स्वत:च्या पुतळ्याच्या स्वच्छतेसाठी अर्ज द्या. त्याशिवाय आम्ही हलणार नाही. कारण आम्ही सत्ता आणि पदात धुंद आहोत. आपल्या मोठेपणाशी आम्हाला देणेघेणे नाही. दादासाहेब, माफ करा, सवड मिळाली तर स्वच्छतेचे पाहू.

Web Title: Self Kannamvarji, we are sorry ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.