कापसाची कवडीमोल भावात विक्री

By admin | Published: October 24, 2015 12:26 AM2015-10-24T00:26:32+5:302015-10-24T00:30:13+5:30

जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, जिवती आदी तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

Sell ​​cotton in a wasteful price | कापसाची कवडीमोल भावात विक्री

कापसाची कवडीमोल भावात विक्री

Next

शासकीय खरेदीला प्रारंभ नाही : तेलंगणा आणि यवतमाळ जिल्ह्यात जातोय कापूस विक्रीला
चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, जिवती आदी तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी साधारणत: सव्वा लाख हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. सध्या सर्वत्र कापूस वेचणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या घरी कापसाची आवक सुरू झाली आहे. मात्र शासनाने अद्यापही कापूस खरेदीला प्रारंभ केला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी होत आहे. मात्र या ठिकाणी कवडीमोल भावात शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे.
यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ५० रुपयेच हमीभाव वाढवून शासनाने जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या अच्छे दिनाची निराशा झाल्याचे शेतकरी सांगतात. कापसाचा उत्पादन खर्च जवळपास ६८०० रुपयाहून अधिक असून प्रति क्विंटल ४ हजार १०० रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला आहे. या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही.
सध्या जिल्ह्यात वरोरा व माढेळी या ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली आहे.
कोरपना तालुक्यात एकमेव कापूस संकलन केंद्र कोरपना येथे असून अद्यापही केंद्राचे उद्घाटन झालेले नाही. वरोरा व माढेळी या ठिकाणी कापसाला जो भाव दिला जात आहे, तो शेतकऱ्याला आर्थिक अडचणीत टाकणारा आहे. त्यामुळे आर्थिक चणचण असलेले शेतकरी तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद तर काही शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे कापसाची विक्री करताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा घेत गावागावात काही खासगी व्यापारी कापसाची खरेदी करीत आहेत.
साधारणत: ३८०० ते ३९०० रुपयात ही खरेदी केली जात आहे. कापसाचा प्रवास खर्च, मजूर आणि नगदी पैशामुळे शेतकरी गावातच कापूस विक्री करणे पसंत करीत आहे. असे असले तरी या विक्रीतून शेतकऱ्यांनाच प्रति क्विंटलमागे दीड हजारांचे नुकसान सोसावे लागत आहे. कापसाचे उत्पादन सप्टेंबर महिन्यापासून सुरु होते. त्याआधी कापूस खरेदी केंद्र सुरु होणे गरजेचे आहे.
परंतु अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांकडील कापूस विक्री झाल्यानंतर कापूस केंद्र सुरु होत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे पणन महासंघाकडे आता शेतकरी पाठ फिरविताना दिसतात. यावर्षी कापसाची उतारी पाहिजे त्या प्रमाणात नसल्याचे गावागावातील कापूस उत्पादनावरुन दिसून येत आहे. यातच तालुक्यात काही शेतशिवारात व्हायरल रोगाने उभी पिके जागीच वाळून गेली. त्यामुळे नदीपट्यातील शेतकरी चिंतातूर झाला असून शासनानेही यासाठी पाहिजे ती मदत केली नाही.
कापसाचे मोठे पिक घेणाऱ्या सोनुर्ली, बोरगाव, भोयगाव, कवठाळा, तळोधी, बाखर्डी आदी शेतशिवारात उत्पादन कमी आहे. कापसाच्या वेचनीचा खर्चही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे तर काही गावात स्थानिक मजूर मिळत नसून अधिक मजुरीच्या लालसेपोटी मजुरांचे स्थानांतरण बाहेरगावी मोठ्या प्रमाणात होत आहे.
त्यामुळे कापूस बऱ्याच शेतात वेचणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. शासनाने हमीभावात वाढ करून शासकीय कापूस खरेदी केंद्र त्वरित नियोजित गावात सुरु केल्यास शेतकऱ्यांचा वेळ, अंतर व आर्थिक खर्च वाचेल. तेव्हा याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)

खासगी व्यापाऱ्यांचा कापूस जातोय मध्य प्रदेशात
काही खासगी कापूस खरेदीदार व्यापारी गावागावात जाऊन कापूस खरेदी करीत आहे. सदर कापसाची विक्री राज्याबाहेर मध्येप्रदेशातील सौसेर व पांदूर्णा कापूस संकलन केंद्रावर अधिक भावाने केली जात असल्याचे समजते.

सोयाबीनचीही उतारी घसरली
यावर्षी पावसाचा अनियमितपणा व काही बियाण्याच्या फरकामुळे सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठी घसरण दिसत आहे. एकरी सात ते आठ क्विंटलच्यावर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीन ते चार क्विंटलवरच समाधान मानावे लागत आहे. यातच बाजारात ३९०० रु. खरेदीभाव असताना व्यापाऱ्यांकडून ३६०० ते ३७०० रुपयात प्रत्यक्ष खरेदी सुरु आहे.

शेतकऱ्यांची लूट
काही व्यापारी शेतकऱ्यांची गरज ओळखून कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांची लूट होताना दितस आहे.यावर आळा घालण्याची गरज आहे.

मजुरांसाठी प्रवासाचा अधिक खर्च
बऱ्याच गावात वेचणीसाठी मजूर नसल्याने आॅटो, छोटा हत्तीचे भाडे शेतकरी देत आहे. यामध्ये एका दिवशी ५०० ते ७०० रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बाहेरगावातील मजूर प्रवासखर्चाशिवाय वेचणीस तयार होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.

Web Title: Sell ​​cotton in a wasteful price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.