खाद्य पदार्थांची उघड्यावर विक्री
By admin | Published: June 15, 2014 11:26 PM2014-06-15T23:26:16+5:302014-06-15T23:26:16+5:30
उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी चंद्रपूर शहरात मात्र उघड्यावर अन्न पर्दार्थाची विक्री केली जात आहे. वळवाच्या पावसाला सुरूवात झाली
नियमांचा फज्जा : पावसाळ्यात गंभीर आजार बळावण्याची शक्यता
चंद्रपूर: उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी चंद्रपूर शहरात मात्र उघड्यावर अन्न पर्दार्थाची विक्री केली जात आहे. वळवाच्या पावसाला सुरूवात झाली असून मान्सूनच्या पावसाला लवकरच प्रारंभ होणार आहे. या पाश्वभूमीवर उघड्यावर होणारी खाद्य पदार्थाची विक्री नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरणार आहे. असे असले अन्न व औषध प्रशासनाने याविरुद्ध अद्याप आपले पाऊल उचलले नाही.
यंदाच्या उन्हाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणावर कार्बाईडने पिकविलेल्या आंब्याची विक्री झाली. मोसमाच्या शेवटी-शेवटी अन्न व औषध प्रशासनाने केवळ दोन ठिकाणी धाडी टाकून कायदेशीर कारवाई केली. नंतर मात्र कुणाविरुद्धही कारवाई करण्यासाठी कायद्याचे हत्यार उपसल्या गेले नाही. खाद्य पदार्थांची विक्री करताना अनेक नियम पाळावे लागतात. ज्या ठिकाणी स्टॉल आहे, तेथे सांडपाणी वाहूून नेणारी नाली नसावी अथवा एखाद्या गटाराच्या काठावर स्टॉल लावू नये, असा नियम आहे. मात्र शहरातील अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांना या नियमाला बगल दिली आहे. अनेक स्टॉल सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीच्या काठावरच असून त्या ठिकाणावरून सर्रास खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे.
ज्या दुकानातून खाद्य पदार्थांची विक्री केली जाते, त्या दुकानात स्वच्छता ठेवण्याचा नियम आहे. मात्र शहरातील काही हॉटेल्सना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली असता, काही ठराविक हॉटेल्समध्येच ही स्वच्छता पाळली जात असल्याचे दिसून आले. खाद्य पदार्थांवर जाळीसारखे आवरण झाकले पाहिजे, असाही नियम आहे. परंतु मुख्य मार्गावरील अनेक दुकानांमध्ये खाद्य पदार्थ उघड्यावर ठेवले जातात. रस्त्यावरून वाहनांचे आवागमन सुरू राहत असल्याने या पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर धूळ बसते. त्यामुळे हे पदार्थ दूषित होतात. त्यापासून आरोग्याला बाधा पोहचते. परंतु असे असतानाही धुळीने माखलेले खाद्य पदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. याविरुद्ध मात्र अद्यापही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही.
लवकरच पाऊस सुरू होण्याची चिन्हे आहेत. अकाली पाऊस अधून-मधून बरसत आहे. त्यामुळे उघड्यावरील पदार्थ खाणे, नागरिकांच्या आरोग्यावर बेतणारे ठरणार आहे.
शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या लहान हॉटेलमध्ये हा प्रकार सर्वाधिक सुरू आहे. पावसाच्या दिवसांत उघड्यावरील पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार बळावू शकतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे नागरिकांनी टाळावे, तसेच खाद्य पदार्थ विक्रेत्यांनीदेखील सर्व नियमांचे कठोर पालन करून आपला व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त जी.बी. गोरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)