दारूविक्री... ती ही चक्क काऊंटर उघडून !
By admin | Published: April 11, 2017 12:46 AM2017-04-11T00:46:43+5:302017-04-11T00:46:43+5:30
शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली असली तरी अजूनही जिल्ह्यात दारू मिळत असल्याचे निदर्शनास येते.
लोकमतने केले स्टिंग आॅपरेशन : व्हीडिओ बघताच पोलिसांनी केली कारवाई
आशिष देरकर कोरपना
शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली असली तरी अजूनही जिल्ह्यात दारू मिळत असल्याचे निदर्शनास येते. कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे तर चक्क दुकानासारखे काऊंटर उघडून दारूची विक्री केली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आपरेशनवरून सिद्ध झाले. लोकमतने तयार केलेल्या व्हिडिओच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दारूविक्रेत्यावर तत्काळ कारवाई केली आहे.
भंडारी रायमलू ओदेलू (५०) रा. शांती कॉलोनी नांदाफाटा असे आरोपीचे नाव आहे. नांदाफाटा येथील शांती कॉलोनी व बिबी येथील रामनगर कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरु आहे. यासंदर्भात अनेकदा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही. ज्या ठिकाणी ही दारूविक्री होते, त्या तेलगु लोकांच्या वस्त्या आहे. शांती कॉलनी व रामनगर दारूचे अड्डे बनले असून परिसरातील तळीरामांची सकाळ-सायंकाळ याठिकाणी मोठी वर्दळ असते. दारूविक्रीच्या परिसरातच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांचे कार्यालय आहे. एसडीपिओंच्या आदेशाचे पोलिसांकडून पालन होत नाही.
युवक राबवणार मोहीम
अनेकदा पोलिसांनी तपासणी केल्यानंतरही दारूविक्रेते सापडत नसल्याने रामनगर बिबी येथील युवकांनी स्वत: दारू पकडून देण्याची मोहीम सुरु केली आहे. रविवारी वार्डात दिवंडी घालून दारूविक्रेत्यांना चेतावणी देण्यात आली असून पुन्हा दारू सापडल्यास कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे युवकांनी म्हटले आहे. त्यांच्या या मोहिमेस उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दुजोरा दिला असून अशा पद्धतीने युवकांनी कार्य करून पोलिसांना सहकार्य केल्यास विविध गावातील दारूबंदी सहज शक्य होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
असे झाले स्टिंग
१५० रुपयात देशी दारू व ३०० रुपयात इंग्लिश दारू विक्री शांती कॉलनीतील भंडारी यांच्याकडे सुरु असल्याची माहिती लोकमत प्रतिनिधीला मिळाली. लोकमतने मोबाईलच्या माध्यमातून एक स्टिंग केले. या स्टिंग आॅपरेशनमध्ये दारू न पिणाऱ्या एका युवकाला व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यासाठी पाठविण्यात आले. युवकाने कोणालाही न दिसता व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. सदर व्हिडीओमध्ये दारूविक्री करताना भंडारीचा भंडाफोड झाला. तात्काळ सदर माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी भंडारी यांच्या घराची झडती घेतली. मात्र त्यावेळी काहीच हाती लागले नाही. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी भंडारी यांच्यावर दारुबंदी प्रतिबंधक कायदा ८५/१ नुसार कारवाई केली.
पोलीस अधिकारी अंधारात
प्रत्येक ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार दारूविक्रेत्यांकडे कारवाई करण्यासाठी पोहचू शकत नाही. पोलीस मित्र किंवा लोकांकडून आलेल्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील पोलिसांना कारवाईसाठी पाठविण्यात येते. मात्र त्यापैकी अनेक पोलिसांचे दारूविक्रेत्यांसोबत लागेबांधे असून दारूविक्रेत्यांना आधीच हुशार करण्याचे काम पोलीस कर्मचाऱ्यांकडून होत असते. त्यामुळे दारूविक्रेत्यांचे मनोबल वाढत चालले आहे. मात्र दोन्ही पोलीस अधिकारी याबाबत अनभिज्ञ आहे.
पोलीस विभागाच्या वतीने आम्ही दारूविक्री करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करीत आहो. पोलिसांना प्रत्येकदा अवैध दारूविक्रेत्याकडे पोहोचणे शक्य होत नाही. दारूविक्रेत्यांकडे पोहचतपर्यंत दारूविक्रेते दारूची विल्हेवाट लावतात. तरी प्रत्येक तक्रारीवर कारवाई करण्यात येते. गडचांदूर उपविभागात ९० टक्के दारुबंदी यशस्वी झाली आहे. लवकरच आम्ही १०० टक्क्यांचे लक्ष पूर्ण करणार आहो. यासाठी पोलीस विभागाला जनतेचे सहकार्य हवे आहे.
- सुधीर खिरडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर