चार हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात
By परिमल डोहणे | Published: September 13, 2022 08:53 PM2022-09-13T20:53:55+5:302022-09-13T20:54:21+5:30
केस पेपर नागपूर कार्यालयात पाठविण्यासाठी मागितली लाच
चंद्रपूर : सेवानिवृत्त प्रकरणाची कागदपत्र नागपूर महालेखापाल कार्यालयात पाठविण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेमधील अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगहाथ अटक केली. गोपालकृष्ण उमाजी पेन्टेवार असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार हे चिमूर तालुक्यातील तळोधी येथील सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिक आहेत. यांचे पेन्शन केस पेपर महालेखापाल कार्यालय, नागपूर येथे पाठविण्याच्या कामाकरिता वरिष्ठ लिपिक गोपालकृष्ण पेन्टेवार यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान, चार हजार रुपयात तडजोड झाली.
परंतु, तक्रारकर्त्याला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार चंद्रपूर लाचलुचपत पथकाकडे केली. या पथकाने सापळा रचून मंगळवारी गोपालकृष्ण पेन्टेवार यांना पैसे स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, पोलीस उपनिरीक्षक रमेश दुपारे, नरेश नन्नावरे, रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, आमोल सिडाम, मेधा मोहुर्ले, पुष्पा कोचाळे आदींनी केली.