भाजीपाला उत्पादकांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:29 AM2021-01-25T04:29:30+5:302021-01-25T04:29:30+5:30

गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यात गणेशपिपरी, सुकवासी व अनेक गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. यापैकी काही शेतकरी भाजीपाला ...

Separate facilities will be set up for vegetable growers | भाजीपाला उत्पादकांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार

भाजीपाला उत्पादकांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणार

googlenewsNext

गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यात गणेशपिपरी, सुकवासी व अनेक गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. यापैकी काही शेतकरी भाजीपाला थेट व्यापाऱ्यांना विकतात, तर काही शेतकरी गोंडपिपरीतील गुजरीच्या माध्यमातून व्यवसाय करतात. थेट व्यापाऱ्यांना सरसकट माल विक्री करीत असल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान थांबविण्यासाठी नगर पंचायत प्रशासनासोबत समन्वय साधून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वंतत्र सुविधा उभारण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन तहसीलदार के. डी. मेश्राम यांनी केले.

तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने रविवारी विकेल ते पिकेल या संकल्पनेंतर्गत संत सावता माळी रयत बाजार योजनेच्या माध्यमातून शेतकरी ते थेट ग्राहक विक्री व्यवस्था उपक्रमाचे उद्घा‌टन करताना ते बोलत होते.

तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार, मंडळ कृषी अधिकारी पानसर, गोलाईत आदींची यावेळी उपस्थिती होती. गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावात मोठ्य प्रमाणावर शेतकरी उत्पादक आहेत. त्यांच्याकरिता गोंडपिपरीत स्वतंत्र सुविधा नसल्याने भाजीपाल्याचे व्यापारी जिथे बसतात तिथेच त्यांना आपला माल विकावा लागतो. सोबतच अनेक शेतकरी बांधव सरसकट कमी भावात ठोक व्यापाऱ्यांना माल विकून मोकळे होतात. परिणामी त्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. शेतकरी बांधवांनी पिकविलेल्या पिकांना योग्य तो भाव मिळावा व त्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यत पोहोचविला जावा, या हेतूने कृषी विभागाने जनजागृतीसाठी हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती यावेळी तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी दिली.

या उपक्रमासाठी गणेशपिपरी, सुकवासी येथील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे कल्पना चौधरी, प्रदीप पुरमशेट्टीवार, प्रज्ञा देवगडे, सुनिता बाम्हणकर, जे.डी. चंदनबाटवे, रमा महिला बचत गट, सावित्रीबाई बचत गट, श्री विनायक बचट गट, धनश्री महिला बचत गटाच्या महिलांनी सहकार्य केले.

Web Title: Separate facilities will be set up for vegetable growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.