लसीकरण केंद्रात गर्दी टाळण्यासाठी आता स्वतंत्र नोंदणी कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:44+5:302021-03-04T04:53:44+5:30
शहरात १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील सर्वसामान्य नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू ...
शहरात १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील सर्वसामान्य नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली. लसीकरणासाठी को-विन अॅप, आरोग्य सेतू अॅप व संकेतस्थळाचा पर्याय देण्यात आला. लस घेण्याकरिता सोयीप्रमाणे दिवस व वेळेची निवड करण्याची मुभा असल्याने चंद्रपूर शहरातील नागरिक लसीकरण केंद्रात गर्दी करीत आहेत. यातून कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रापासून नोंदणी कक्ष वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता संगणक संच, तांत्रिक सुविधा व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.
कोण करू शकतो नोंदणी?
एका मोबाईल क्रमांकावरून चार नावे नोंदविता येणार असल्याने ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांनाच या नोंदणी कक्षाचा लाभ घेता येईल. शिवाय, ज्या व्यक्तींना ऑनलाईन स्लॉट बुक करता येत नाहीत अशांनी आधारकार्ड, छायाचित्र आयडी, पॅनकार्ड व ओळखपत्र सादर केल्यास नोंदणी केली जाणार आहे.
चंद्रपुरातील कोरोना लसीकरण केंद्र
दुर्गापूर येथील आरोग्य केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रूग्णालय, महानगर पालिकातंर्गत रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, टागोर प्राथमिक शाळा, मातोश्री शाळा तुकूम, पोलीस रूग्णालय (केवळ पोलीस) आदी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे. सोमवारपासून शहरातील पाच खासगी हॉस्पीटलमध्ये लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.
कोट
कोरोना लस घेताना पुणे व मुंबईसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चंद्रपुरात लसीकरण केंद्र व नोंदणी कक्ष वेगवेगळे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक व्यक्ती विविध कारणे सांगून एकाचवेळी गर्दी करतात. कोरोना बाधितांची संख्या बघता असा प्रकार टाळणे गरजेचे आहे.
-आविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी मनपा, चंद्रपूर