वीज कर्मचाऱ्यांसाठी ऊर्जानगरात विलगीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:27 AM2021-05-01T04:27:25+5:302021-05-01T04:27:25+5:30
कोरोना काळातही महावितरण परिमंडळ, महानिर्मिती व महापारेषणचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. चंद्रपूर परिमंडळ मधील ८ व महानिर्मिती चंद्रपूर ...
कोरोना काळातही महावितरण परिमंडळ, महानिर्मिती व महापारेषणचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. चंद्रपूर परिमंडळ मधील ८ व महानिर्मिती चंद्रपूर कार्यक्षेत्रातील ११ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन महानिर्मिती, महापारेषण व महावितरण चंद्रपूर परिमंडळाच्या संयुक्त विद्यमाने तीनही कंपनीत कार्यरत कर्मचाऱ्यांना कोविड बाधित झाल्यास महापारेषण ऊर्जानगर येथील अति उच्च दाब वितरण केंद्र म्हणजे एचव्हीडीसी अतिथीगृहात १ मे पासून विलगीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, महानिर्मितीचे चंद्रपूर महा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे व महापारेषण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके आदींनी बैठकीत घेतला. विलगीकरण कक्षात भोजन, पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महावितरणमध्ये २१८ कर्मचारी कोरोना बाधित कर्मचारी झाले. ८ जणांचा बळी गेला तर ७६ कर्मचारी कोरोनामुक्त झाले. महानिर्मिती चंद्रपूर कार्यक्षेत्रात ५६ कर्मचारी बाधित आहेत. ११ कर्मचाऱ्यांचा जीव गेला तर १४५ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. महापारेषणमध्ये १५ कर्मचारी बाधित तर १२ कोरोनामुक्त झाले.