चंद्रपुरातील कर्करोग रूग्णालय एका वर्षात सेवेत रूजू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:12 AM2018-08-10T00:12:55+5:302018-08-10T00:13:50+5:30
येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात राज्य शासन जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून उभारण्यात येणारे शंभर खाटांचे कर्करोग रूग्णालय ३० जुलै २०१९ पर्यंत जनतेच्या सेवेत रूजू होईल, असे प्रयत्न करा, असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात राज्य शासन जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून उभारण्यात येणारे शंभर खाटांचे कर्करोग रूग्णालय ३० जुलै २०१९ पर्यंत जनतेच्या सेवेत रूजू होईल, असे प्रयत्न करा, असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
बुधवारी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आयोजित बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील कर्करोग रूग्णालयसंदर्भात आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रामध्ये अग्रगण्य व नामांकित असलेल्या टाटा ट्रस्टच्या सहकार्याने रूग्णालय उभारण्यात येणार आहे.
सदर रुग्णालय उच्च दर्जाचे राहील यात मुळीच दुमत नाही. राज्य सरकार सुद्धा या रुग्णालयासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशन या नावाने एक स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्याबाबत सुध्दा यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला वैद्यकिय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकिय शिक्षण संचालक, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व टाटा ट्रस्टचे पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सुक्ष्म नियोजनासाठी टाटा ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या डॅशबोर्ड संदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गावनिहाय विकास आराखड्याची पाहणी करून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती जाणून घेतली.
कार्यकारी समितीवर प्रतिनिधी नेमण्याची सूचना
मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे संचालक मंडळामध्ये दोन सदस्यांपैकी एक सदस्य मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केलेला आणि एक सदस्य टाटा ट्रस्टतर्फे नॅशनल कॅन्सर ग्रीडचे प्रतिनिधित्व करणारा असावा, असे त्यांनी सूचित केले. कार्यकारी समितीवर मुख्यमंत्री यांनी निर्देशित केलेले दोन सदस्य व सिव्हील सोसायटी आॅर्गनायझेशनचे प्रतिनिधी नेमण्याची सूचना सुद्धा त्यांनी यावेळी केली.