सेवा हाच एकमेव भाव असावा - विजय वडेट्टीवार
By admin | Published: August 1, 2016 12:40 AM2016-08-01T00:40:42+5:302016-08-01T00:40:42+5:30
सार्वजनिक जीवनात सेवा हाच एकमेव भाव असावा, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रह्मपुरी : पंचशील मुलांचे वसतिगृहाचे उद्घाटन
ब्रह्मपुरी : सार्वजनिक जीवनात सेवा हाच एकमेव भाव असावा, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
पंचशील एज्युकेशन सोसायटी, ब्रह्मपुरी द्वारा संचालित व माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या स्थानिक विकास निधीतून साकारलेल्या पंचशील मुलांच्या वसतिगृह इमारतीचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून आ. विजय वडेट्टीवार बोलत होते.
यावेळी अध्यक्ष माजी खासदार मारोतराव कोवासे माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी आमदार डा. अविनाश वारजूकर, नागपूर विभागीय समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव झोड आदी उपस्थित होेते.
आ. विजय वडेट्टीवार यांनी संस्थेची प्रशंसा करून या कार्याबद्दल सेवा हाच एकमेव दृष्टिकोन असल्याने विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने ही संस्था दर्जेदार शिक्षण, पोषण आहार व निवासाची सोय करून देत असल्याचे त्यांनी म्हटले.
माजी खासदार कोवासे यांनी सांगितले की, आपल्या कार्यकाळात लोकपयोगी योजना जास्तीत जास्त दुर्बल घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. लोकप्रतिनिधींनी या पद्धतीने कामे करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ब्रह्मपुरी तालुक्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक संस्था सचिव अशोक रामटेके, संचालन प्रा.डॉ. युवराज मेश्राम तर उपस्थितांचे आभार मिलिंद रामटेके यांनी मानले, कार्यक्रमासाठी राजेश बोरकर, राजेंद्र वाढई, मोहन वैद्य, किशोर रामटेके, मेघश्याम वंजारी, शिला घरडे, मंगला टिकले, सुजाता रामटेके, कल्पना शेंडे, सुधीर अलोणे, जगदीश मेश्राम, बौद्धरक्षक जांभुळकर, दिवाकर डांगे, अतुल शेंडे, डेव्हीड शेंडे, पुरण वालवे, सूर्यभान राहाटे, भाविक सुखदेवे, नरेंद्र बांते आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)