आरोग्य केंद्राची सेवा ढेपाळली

By admin | Published: May 22, 2014 11:47 PM2014-05-22T23:47:01+5:302014-05-22T23:47:01+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांचे कर्मचार्‍यांवरील नियंत्रण सुटल्याने आरोग्य सेवेची वाताहत झाल्याचे दिसून येत आहे. धाबा प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यातील सर्वात

Services for health centers | आरोग्य केंद्राची सेवा ढेपाळली

आरोग्य केंद्राची सेवा ढेपाळली

Next

धाबा : प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांचे कर्मचार्‍यांवरील नियंत्रण सुटल्याने आरोग्य सेवेची वाताहत झाल्याचे दिसून येत आहे. धाबा प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यातील सर्वात मोठे असून १२ उपकेंद्रे व ६० हजार लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरविणारे केंद्र आहे. येथे कागदोपत्री दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. प्रत्यक्षात एकच कार्यरत आहे. एक वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहे. आरोग्य सहाय्यकाची पदे रिक्त आहेत. परंतु सेवारत पदेसुद्धा नियंत्रणात नसल्यामुळे वारंवार साथीचे रोग पसरत आहेत. पीएचसीत कार्यरत लिपिक कधीच कार्यालयीन वेळेत उपलब्ध नसतो. क्षेत्रीय कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांची पगार बिले व इतर कामे वेळेवर होत नाहीत. फेब्रुवारी महिन्यापासून कर्मचार्‍यांचे पगार व इतर आर्थिक कामे प्रलंबित आहेत. रुग्ण कल्याण समितीच्या पदाधिकार्‍यांनी बरेचदा वैद्यकीय अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या. परंतु ते दुर्लक्ष करीत आहेत. आशा वर्कर्स, गटप्रवर्तक यांचे मानधन लिपिकाकडून वेळेवर जमा होतच नाही. अहवालाची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. आरोग्य विभागाने ‘डाटा एन्ट्री आॅपरेटर कम अकाऊंटर’ ईगल संस्थेच्या माध्यमातून पुरविला. पण ब्रॉडबॅन्ड कनेक्शन उपलब्ध नसल्यामुळे या कर्मचार्‍याला कामच उरलेले नाही. रुग्ण कल्याण समिती धाबाचे अध्यक्ष अमर बोडलावार यांनी मागील बैठकीतच ब्रॉडबॅन्ड कनेक्शनसाठी आर. के. एस. फंडातून निधीला मंजुरी दिली होती. मात्र, कनेक्शन घेण्याची तसदी प्राथमिक आरोग्य केंद्राने घेतली नाही. रिर्पोटींगची कामे प्रलंबित असून डीएचओंना बैठकीत दिशाभूल करणारी उत्तरे अधिकारी, कर्मचारी देत असतात. ओपीडीची वेळ सकाळी ८ व सायंकाळी ४ वाजताची असली तरी, पीएचसीत कुणीही कर्मचारी उपलब्ध नसतात. प्रसुतीसाठी आलेल्यावरही पहिला उपचार अटेन्डंट व स्वीपर यांनाच करावा लागतो. कारण दवाखान्यात जबाबदार असे कुणीही हजर नसतात. बाळंत झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांकडून रक्कम वसूल केली जात असल्याची चर्चा आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांकडे या संदर्भात बरेचदा तक्रारी झाल्या. मात्र, ते मनावर घेत नाहीत. याच प्रकारातून २१ एप्रिल रोजी माता-अर्भक मृत्यूचे एक प्रकरण घडले होते. कर्मचारी वेळेवर पोहचले नाही की त्यांंची कामे स्वत: वैद्यकीय अधिकारी करणे पसंत करतात. मात्र, संबंधित कर्मचार्‍यांस जाब विचारीत नाहीत. सर्वेक्षणाची कामे बरोबर होत नसल्याच्या तक्रारी येऊनसुद्धा वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोणावरही कारवाई केलेली नाही. त्यामुळे कर्मचारी निर्ढावले आहेत. पावसाळ्यातील मच्छरदाणींचे वाटप चक्क मार्च-एप्रिल महिन्यात झाले. यावरून येथील कर्मचार्‍यांच्या तत्परतेची कल्पना येते. आता जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनीच या केंद्राकडे गांभीर्याने लक्ष देऊन परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची गरज आहे. (वार्ताहर)

Web Title: Services for health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.