जीबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:25 AM2021-04-14T04:25:47+5:302021-04-14T04:25:47+5:30
सावली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवीत असताना प्रशासनाची दमछाक होत आहे. उपलब्ध कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी जागा अपुरी ...
सावली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवीत असताना प्रशासनाची दमछाक होत आहे. उपलब्ध कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी जागा अपुरी पडत आहे. सावली तालुक्यात दोन वर्षांपासून बांधून तयार असलेल्या जीबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील सुजाण नागरिकांकडून होत आहे.
दोन वर्षापूर्वीच जीबगाव येथे अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. परंतु त्या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त अजूनही सापडलेला नाही. दरम्यान, कोविड विषाणूने दुसऱ्यांदा थैमान घातले आहे. रुग्णांना जागा नसल्याचे अनेक आरोप होत आहेत. सावली तालुक्यातील जीबगाव येथे वैनगंगा नदीच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. रुग्णालय परिसरातच अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता सदनिका बांधून तयार आहेत. मात्र मागील दोन वर्षांपासून त्या निरुपयोगी आहेत. कोविड रुग्णांसाठी जागेची अडचण लक्षात घेता येथे केंद्र उभारल्यास प्रशासनाचा ताण कमी होण्यास मदत होईल.