सेट टॉप बॉक्ससाठी ३१ मार्चची मुदत
By admin | Published: January 19, 2017 12:44 AM2017-01-19T00:44:49+5:302017-01-19T00:44:49+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागाने शहरी तथा ग्रामीण क्षेत्रातील केबल ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सेट टॉप बॉक्स लावण्याचे आवाहन केले होते.
मनोरंजन विभागाची माहिती : शहरी भागात लागले ९० टक्के सेट टॉप बॉक्स
चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागाने शहरी तथा ग्रामीण क्षेत्रातील केबल ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सेट टॉप बॉक्स लावण्याचे आवाहन केले होते. मात्र ग्रामीण क्षेत्रासाठी अवधी वाढवून देण्यात आला असून ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बॉक्स लावण्याची मुभा देण्यात आली आहे. तर शहरी क्षेत्रातील अनेकांच्या टीव्हीवर मुंग्या आल्या होत्या. त्यामुळे यापूर्वीच ९० टक्के ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स लावल्याची माहिती मनोरंजन विभागाने दिली आहे.
सेट टॉप बॉक्स लावण्यासाठी ग्रामीण क्षेत्रातील ग्राहकांना तीन महिन्याची मुदत वाढवून देण्यात आल्याने आणखी काही दिवस त्यांना केबलचा आनंद घेता येणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार आॅक्टोंबर महिन्यात सर्व ग्राहकांना सेट टॉप बॉक्स लावण्याचे अनिवार्य करण्यात आले होते. ज्यांनी सेट टॉप बॉक्स लावले नाही, अशांचे केबल प्रसारण बंद करण्यात आले होते. त्यामुळे शेकडो ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, या काळात शहरी भागातील जवळपास ९० टक्के ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स लावून घेतले. तर काही जण आजही सेट टॉप बॉक्स लावण्यासाठी उदासिन दिसून येतात. मात्र अशांच्या टीव्हीवर मुंग्या दिसत असल्याने त्यांनाही लवकरच सेट टॉप बॉक्स लावावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय मनोरंजन विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरी क्षेत्रातील एनलॉग सिस्टम फेस ३ बंद करण्यात आले आहे. मात्र वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार ग्रामीण क्षेत्रातील एनलॉग सिस्टम फेस ४ सुरूच ठेवण्यात आले आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी डेटलाईन ३१ मार्च करण्यात आली असून आणखी दोन महिने सेट टॉप बॉक्सविना ग्रामीण ग्राहकांना केबलचा आनंद घेता येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सेट टॉप बॉक्सवर लूट
जिल्ह्यात शहरी तथा ग्रामीण क्षेत्रात यूसीएन, जीटीपीएल, सीटी केबल, वीसीसीए आदी कंपन्यांकडून केबल आॅपरेटरांना सेट टॉप बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र ग्राहकांना सेट टॉप बॉक्स लावून देण्यात मोठी लूट सुरू असून दर वेगवेगळे आकारले जात आहे. काही जण १ हजार रूपयात तर काही जण १५०० ते १८०० रूपयात सेट टॉप बॉक्स लावून देत आहेत. त्यामुळे अनेकांची लूट होत आहे.
ग्राहकांसाठी सुविधा
एका केबल आॅपरेटने दिलेल्या माहितीनुसार सेट बॉक्स सर्वांकडे उपलब्ध आहेत. ग्राहकांना सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर रक्कम एका वेळी देण्यास अडचण येत असेल तर दोन ते तीन हप्तात रक्कम अदा करण्याची सुविधा ग्राहकांना देण्यात आली आहे. मात्र तरीही काही ग्राहक निरूत्साही असल्याचे सांगितले.