वर्षभरापासून रेंगाळलेल्या प्रकरणाचा निपटारा
By admin | Published: June 26, 2014 11:09 PM2014-06-26T23:09:37+5:302014-06-26T23:09:37+5:30
येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने मागील वर्षी शासकीय धान्य पुरवठा योजनेअंतर्गत वाटप साहित्यासाठी १३ हजार रुपयांचा भरणा केला. मात्र वाटपाचे साहित्य मिळाले नाही. तब्बल एक वर्षापासून
गोंडपिपरी : येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने मागील वर्षी शासकीय धान्य पुरवठा योजनेअंतर्गत वाटप साहित्यासाठी १३ हजार रुपयांचा भरणा केला. मात्र वाटपाचे साहित्य मिळाले नाही. तब्बल एक वर्षापासून संबंधित कार्यालयाची पायपीट व पत्रव्यवहाराशिवाय रक्कम परत न मिळण्याची तक्रार उपविभागीय अधिकारी कार्यालयात करताच, वर्षभरापासून रेंगाळलेल्या प्रकरणाचा प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारुन उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांनी केवळ दोन तासातच प्रकरणाचा निपटारा केला व रक्कम परत करण्याच्या शासकीय प्रक्रियेला प्रारंभ झाला.
स्थानिक आझाद हिंद चौकामध्ये सरकारी स्वस्त धान्य पुरवठा दुकान आहे. सदर स्वस्त धान्य परवाना संगीता शंकर पाल यांच्या नावे असून त्यांनी मागील वर्षी स्वस्त धान्य सोबतच शासकीय पुरवठा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पामोलियन तेलासाठी रेशनकार्डानुसार १३हजार रुपये पूर्व अमानत रक्कमेचा भरणा केला. मात्र शासनाच्या पुरवठा विभागाकडून केवळ स्वस्त धान्य वगळता तेल साठा पुरविण्यात आला नाही. या संदर्भात स्वस्त धान्य परवानाधारक संगीता शंकर पाल यांनी स्थानिक तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा शाखा व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात वारंवार जाऊन तेल पुरवठा संबंधित भरणा केलेल्या रकमेच्या परतीसाठी प्रत्यक्ष भेट व पत्रव्यवहार केला. यातच वर्ष लोटूनही आपली रक्कम शासनाकडून परत न मिळाल्याने अखेर काल येथील उपविभागीय कार्यालयात शंकर पाल यांनी उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांची भेट घेऊन आपबीती सांगितली.
यावरुन पराते यांनी नायब तहसीलदार पुरवठा विभाग कर्मचारी यांची कानउघाडणी करुन ताबडतोब जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशीही वार्तालाप करीत रक्कम परतीचे पत्र तयार करुन वर्षभरापासून रेंगाळलेल्या प्रकरणाचा केवळ दोन तासांतच निपटारा केला. शासनाच्या सदोष प्रणालीतही अपवादाने कर्तव्य दक्ष अधिकारी कार्यरत असल्याचा अनुभव या कारवाईतून आला. प्रत्येक अधिकाऱ्याने हे धोरण अवलंबल्यास कामांचा निपटारा होईल, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)