सेवाग्राम-मुंबई ट्रेन कायमस्वरुपी बंद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 05:00 AM2021-10-25T05:00:00+5:302021-10-25T05:00:38+5:30
चंद्रपूर तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाणे सोयीचे व्हावे, यासाठी नागपूर - सेवाग्राम एक्सप्रेसला बल्लारशाह - भुसावळ या पॅसेंजरचे सहा डब्बे जोडले जात होते. चंद्रपूर येथे बसले की, थेट मुंबईत पोहोचत होते. त्यामुळे ज्येष्ठांपासून नोकरदार व विद्यार्थ्यांनाही ही ट्रेन सोयीची होती. कोरोना संकट आले आणि बल्लारशाह - भुसावळ ही पॅसेंजर बंद झाली. परिणामी बल्लारपूर येथून थेट मुंबईत जाणेही प्रवाशांचे बंद झाले. आता विशेष ट्रेन सुरु आहेत. मात्र, प्रवाशांना त्रासदायक झाले आहे.
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी बल्लारशाह - मुंबई सेवाग्राम ही हक्काची ट्रेन होती. मात्र, कोरोना संकटापासून बंद असलेली ही ट्रेन अद्याप बंदच आहे. आता तर एलएचबी प्रणालीमुळे ती कायमस्वरुपी बंद होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे येथील प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडून मुंबईला जावे लागत आहे.
चंद्रपूर तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाणे सोयीचे व्हावे, यासाठी नागपूर - सेवाग्राम एक्सप्रेसला बल्लारशाह - भुसावळ या पॅसेंजरचे सहा डब्बे जोडले जात होते. चंद्रपूर येथे बसले की, थेट मुंबईत पोहोचत होते. त्यामुळे ज्येष्ठांपासून नोकरदार व विद्यार्थ्यांनाही ही ट्रेन सोयीची होती. कोरोना संकट आले आणि बल्लारशाह - भुसावळ ही पॅसेंजर बंद झाली. परिणामी बल्लारपूर येथून थेट मुंबईत जाणेही प्रवाशांचे बंद झाले. आता विशेष ट्रेन सुरु आहेत. मात्र, प्रवाशांना त्रासदायक झाले आहे.
अप-डाऊनही झाले बंद
बहुतांश कर्मचारी वर्धा, हिंगणघाट, वरोरा तसेच इतरही ठिकाणांहून याच ट्रेनने चंद्रपूर तसेच चंद्रपूर येथील कर्मचारी अन्य ठिकाणी अप-डाऊन करून नोकरी करायचे. मात्र, हक्काची ट्रेन बंद असल्याने या सर्वांची मोठी अडचण झाली आहे. अनेकांना कुटुंबीयांना सोडून मुख्यालयीच राहावे लागत आहे.
लहान व्यावसायिकांचेही नुकसान
सेवाग्राम ट्रेन दररोज होती. त्यामुळे यामध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असायची. याचा फायदा घेत चंद्रपूर - बल्लारशाह तसेच इतरही ठिकाणचे लहान व्यावसायिक ट्रेनमध्ये खाण्या-पिण्यासह अन्य साहित्य विकायचे. मात्र, ट्रेनच नसल्याने अनेकांचा व्यवसाय बंद झाला आहे. विशेषत: वरोरा परिसरातून अनेक जण सिझनमध्ये शिंगाडे आणून विकायचे. मात्र, आता ते विकणेही बंद झाले आहे.
कॅन्सर रुग्णांचे बेहाल
चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्ण मोठ्या प्रमाणात मुंबईतील टाटा तसेच इतर रुग्णालयात उपचारासाठी जातात. मात्र, सोयीची असलेली सेवाग्राम ट्रेन मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना वर्धा येथून ट्रेन पकडून मुंबईला जावे लागते.
थेट ट्रेनशिवाय पर्याय नाही
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी आता थेट ट्रेन सुरु करावी लागणार आहे. मात्र, एलएचबी प्रणालीमुळे ती सुरु होणे सध्या तरी कठीण आहे. त्यामुळे प्रवाशांना वर्धा, नागपूर येथूनच पुढील प्रवास करावा लागणार आहे.
रेल्वे अधिकारीही गप्प
सर्वांच्या सोयीची असलेली सेवाग्राम ट्रेन बंद आहे. यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. असे असले तरी रेल्वे विभागातील अधिकारी गप्प आहेत. विशेष म्हणजे, सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांनी अनेकवेळा निवेदन दिली आहे. मात्र, अद्याप काहीच हालचाली झाल्या नाहीत.
सेवाग्राम एक्स्प्रेस बंद आहे. त्यामुळे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईत जाणे कठीण झाले झाले. वर्धा किंवा नागपूर येथे विशेष ट्रेन पकडावी लागत आहे. विशेषत: कॅन्सरग्रस्त रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आठवडाभर नाही तर किमान दोन दिवस तरी मुंबईसाठी ट्रेन चालवावी. यासंदर्भात रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे अनेकवेळा निवेदने दिली आहेत.
- श्रीनिवास सुंचूवार,
झेडआरयुसी सदस्य, मध्यरेल्वे