चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने अंगणवाडीतील सात बालकांना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 12:14 PM2023-09-21T12:14:14+5:302023-09-21T12:15:03+5:30
लांबोरीतील घटना : सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर
जिवती (चंद्रपूर) : चंद्रज्योतीच्या (जट्रोपा) बिया खाल्ल्याने लांबोरी अंगणवाडीतील सात विद्यार्थ्यांना बुधवारी विषबाधा झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. या बालकांना उपचारासाठी गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आहे. मनीषा माणिकराव कोडापे (३), यतमा संजय कोडापे (३), नागू गंडू कोडापे (४), शामू गंडू कोडापे (२), विष्णू बारीकराव सिडाम (२), आदर्श कर्णू सिडाम (२), कृष्णा बारीकराव सिडाम (२) अशी उपचार घेत असलेल्या बालकांची नावे आहेत.
लांबोरी येथील अंगणवाडी इमारतीच्या बाजूला जट्रोपाचे एक झाड आहे. मनीषा कोडापे, यतमा कोडापे, नागू कोडापे, शामू कोडापे, विष्णू सिडाम, आदर्श सिडाम, कृष्णा सिडाम ही मुले बुधवारी अंगणवाडीसमोरच खेळत होती. दरम्यान, चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे त्यांना उलट्या होऊ लागल्या. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोडापा, उपसरपंच, कमलाकर जाधव, चिनू पाटील कोडापे, पोजू रामा कोडापे यांना मिळताच मुलांना गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी आणले. परंतु तिथे कुणीही नसल्याने लगेच जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान, लक्ष्मण कोडापे यांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी मुरुगानाथम यांना माहिती दिली असता त्यांनी मुलांच्या प्रकृतीची विचारणा केली आणि उत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
उपचारासाठी धावाधाव
जिवती येथे ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली. पण केवळ शोभेची वास्तू आहे. आदिवासी भागात अत्यावश्यक आरोग्यसेवा देणारे ग्रामीण रुग्णालय सुरू न झाल्याने संकटाप्रसंगी धावाधाव करावी लागते. लांबोरी येथील बालकांबाबतही असा प्रकार घडला. हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे जिवती ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांनी केली.
जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलांची योग्य तपासणी झाली. पुढील उपचारासाठी गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात संदर्भ सेवा देण्यात आली. सर्व बाधित मुलांची प्रकृती चांगली आहे.
- डॉ. स्वप्निल टेंभे, तालुका आरोग्य अधिकारी, जिवती