सात धरणे ‘ओव्हरफ्लो’
By admin | Published: September 27, 2016 12:44 AM2016-09-27T00:44:43+5:302016-09-27T00:44:43+5:30
मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून...
जनजीवन विस्कळीत : परतीचा पाऊस थांबता थांबेना
चंद्रपूर : मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून काही नद्यांना पूर आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे आधार असलेल्या व उन्हाळ्यात ड्राय झालेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आता ओव्हरफ्लो झाले आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे रविवारी उघडण्यात आले असून घोडाझरी, डोंगरगाव हे दोन सिंचन प्रकल्प शंभरी गाठण्यावर आले आहेत.
गेल्या बुधवारपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू असून या पावसाने अद्यापही उसंत घेतलेली नाही. थांबून-थांबून पावसाच्या सरी बरसत असल्याने आता बस्... पाऊस नको, असे अनेक नागरिक बोलून दाखवित आहेत. या पावसाने भारी धान पिकाला फायदा होत असला तरी इतर पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक पावसामुळे चिंतेत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. पाटबंधारे विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर गेल्या २४ तासात जिल्ह्यात २६.२८ च्या सरासरीने ३९४.३ मिमी पावसाची नोंद झाली. तर १ जूनपासून आजपर्यंत १३३३.४६ च्या सरासरीने २०००१.९ मिमी पाऊस झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पावसाने घर कोसळले
बाखर्डी : सततच्या पावसाने घर पडल्याची घटना कोरपना तालुक्यातील निमणी येथे घडली. यात भाऊराव ढावस यांचे मातीचे घर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत शेजारचे बोबडे व ढवस यांचेही मोठे नुकसान झाले असून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
ब्रह्मपुरी तहसील कार्यालयावर कोसळली वीज
ब्रह्मपुरी : सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसात येथील तहसील कार्यालयावर वीज कोसळल्याची घटना घडली. यात संगणक व इतर साहित्य जळाल्याने चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटाने तहसील कार्यालय परिसर हादरून गेला. कार्यालयाजवळील टॉवरवर वीज कोसळल्याने सुरू असलेले तहसील कार्यालयाचे ११ संगणक, इंटरनेट मोडम, प्रिंटर्स, वायरिंग व इतर साहित्य जळून खाक झाले. यात चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती विद्याधर चव्हाण यांनी दिली आहे.