वरोऱ्यात साडेनऊ लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 08:40 PM2018-04-14T20:40:02+5:302018-04-14T20:40:24+5:30
वरोरा शहरातील गुड्स गॅरेजवर शनिवारी कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून नऊ लाख ६२ हजार रूपये किंमतीचे चोर बीटी बियाणे जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : . वरोरा शहरातील गुड्स गॅरेजवर शनिवारी कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून नऊ लाख ६२ हजार रूपये किंमतीचे चोर बीटी बियाणे जप्त केले. गॅरेजमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात चोर बिटी बियाणे जप्तीची ही कार्यवाही राज्यातील पहिलीच असल्याचे मानले जात आहे.
बीटी कपाशी बियाणांनी लागवड केल्यास त्यावर रोगांना प्रादुर्भाव कमी होतो व उत्पादन अधिक प्रमाणात मिळते. या अंदाज घेऊन मागील अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बीटी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात करीत होते. कपाशीच्या पेºयात दरवर्षी वाढ होत असे, पंरतु गेल्या हंगामात बीटी कपाशीवर बोंड अळीने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातील पिकावर नांगर फिरविला. ज्या शेतकऱ्यांना बोंडअळी नंतर कापूस झाला त्याला अत्यल्प दर मिळाला. अश्या अनेक तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. कृषी विभाग यंदा हंगामाच्या काही महिन्यांपूर्वीच सतर्क झाला. वरोरा शहरातील मोहबाळा रस्त्यालगत मंगलम कार्यालय कॉम्प्लेक्स मधील गुड्स गॅरेजमध्ये चोर बीटी बियाणे आल्याची गुप्त माहिती वरोरा येथील कृषी विभागाला मिळाली. कृषी विभागाने पोलीस पथकाच्या मदतीने सदर गॅरेजवर धाड मारली. त्यात चोर बीटीची तब्बल १ हजार ३०० पॉकीट आढळून आले. त्याची किंमत ९ लाख ६२ हजार रूपये आहे. सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक एम. जी. सोनटक्के, तालुका कृषी अधिकरी व्ही. आर. प्रकाश, कृषी पर्यवेक्षक आर. जी. उधाडे, पोलीस उपनिरीक्षक धीरज महाजन व त्याने सहकारी सहभागी झाले होते.
उत्पादक कंपनीचा उल्लेख नाही
चोर बीटी बियाणे अमरावती येथील राठी गॅरेजमधून वरोरा येथील गॅरेजमध्ये पाठविण्यात आले. परंतु त्याची उचल कोण करणार त्याच्या नावाचा उल्लेख नाही. चोर बीटी बियाणांवर उत्पादक कंपनी, उत्पादनाची तारीख लॉट क्रमांक असा कुठेही उल्लेख नाही. चोर बीटी पॉकीटावर सूर्या व कोहीनूर असा फक्त उल्लेख आहे.
तर बियाणे शेतकऱ्यांच्या हातात पडली असती
कृषी व पोलीस पथकाने धाड मारताना जराही विलंब केला असता तर १३०० चोर बीटी पॉकीट शेतकऱ्यांच्या हातात पडले असते. परत या हंगामात कापसाच्या गोंधळात भर पडली असती. चोर बीटी बियाणांचे पॉकीट जप्त करून पोलीस स्टेशन वरोरा येथे ठेवण्यात आले आहे. यामधील सहा पॉकीट गुणवत्ता तपासणीकरिता कृषी विभाग प्रयोगशाळेत पाठविणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
सुटीचा दिवस निवडला
सुटीचा दिवस पॉकीट पाठविण्याकरिता निवडला. १४ एप्रिल रोजी शनिवारला कार्यालय बंद राहतील, त्यातच दुसरा दिवस रविवार यामुळे कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी या दोन दिवसात शहरात राहणार नाही. यासोबत १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात राहतील, त्यामुळे चोर बीटी बियाणांची विल्हेवाट लावणे सुकर होईल, याकरिता सदर दिवसाची निवड केल्याची चर्चा केली जात आहे.