वांगी समजून खाल्ली धोतऱ्याच्या फळांची भाजी; कुटुंबातील सात जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 10:29 AM2022-11-05T10:29:55+5:302022-11-05T10:34:08+5:30
चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार : सर्वांची प्रकृती स्थिर
आक्सापूर (चंद्रपूर) : वांगी समजून विषारी धोतऱ्याच्या फळांची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी येथे घडली. भोजनानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने सर्वांना प्रारंभी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर चंद्रपूरला हलविले आहे.
कुटुंबप्रमुख किसन सोमा खंडारे (६०), त्यांची पत्नी सीताबाई किसन खंडारे (६०), मुलगा तुळशीदास किसन खंडारे (४०), सून रेखा तुळशीराम खंडारे (४०), कमला गणेश नेवारे (४०), अर्चना श्रीकृष्ण नेवारे (४०) व विभा विलास सरवर (१६), शैलेश कोडापे या सात जणांना विषबाधा झाली.
गणेशपिपरी ग्रामपंचायत कार्यालयालगतच्या परिसरात धोतऱ्याचे झाड आहे. त्याला आलेले फळ वांग्यासारखे दिसत असल्याने ते वांगी समजून खंडारे कुटुंबातील महिलांनी ते तोडून आणले व त्याची भाजी शिजवली. रात्रीच्या जेवणानंतर काही वेळातच सर्वांना पोटात मळमळ आणि उलटी सुरू झाली. वांग्यासारखी दिसणारी धोतऱ्याची फळे असल्याची बाब चर्चेतून पुढे आली.
शरीरात अधिक प्रमाणात विष गेल्याने प्रकृती चिंताजनक दिसत असल्याचे पाहून गोंडपिपरीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला दिला. सातही जणांवर येथील चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत.