गमतीतूनच आकाराला आली सात खंजेरीची कला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:46 PM2018-03-09T23:46:36+5:302018-03-09T23:46:36+5:30
महाराष्ट्र अनेक संत, महापुरुषाची कर्मभूमी राहिली आहे. आणि या महापुरूषांच्या परिवर्तनवादी कार्यामुळेच महाराष्ट्राला पुरोगामी अशी ओळख प्राप्त झाली आहे. याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांपासून फुले, शाहु, आंबेडकर यांच्या कार्याने समाजात अनेक परिवर्तन घडले आहेत.
राजकुमार चुनारकर।
आॅनलाईन लोकमत
चिमूर : महाराष्ट्र अनेक संत, महापुरुषाची कर्मभूमी राहिली आहे. आणि या महापुरूषांच्या परिवर्तनवादी कार्यामुळेच महाराष्ट्राला पुरोगामी अशी ओळख प्राप्त झाली आहे. याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांपासून फुले, शाहु, आंबेडकर यांच्या कार्याने समाजात अनेक परिवर्तन घडले आहेत. तेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या कार्याने प्रेरित होऊन सतत ५२ वर्षे सात खंजेरीच्या तालावर समाजात परिवर्तन घडविण्याचे कार्य महाराष्ट्राचे प्रबोधनकार सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज करीत आहेत. बालपणात गंमतजंमत म्हणून उलटी खंजेरी वाजविली व तीच गंमत आता एका वेळेस सात खंजेरी वाजविण्याची कला ठरल्याचा उलगडा प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी ‘लोकमत’जवळ केला.
मंगळवारला चिमूर तालुक्यातील तळोधी ( नाईक) येथे आयोजित प्रबोधन कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे प्रबोधनकार सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज हे आले असता त्यांच्यासोबत प्रस्तुत प्रतिनिधीने दिलखुलास संवाद साधला.
बालपणात मातीच्या मडक्याला कागद लावून खंजेरी बनवून वाजवत होतो. त्यातच मग उलटी खंजेरी वाजवण्याची गंमत करण्याचा प्रयत्न केला. त्या गंमतीतूनच सात खंजेरी वाजविण्याची कला अवगत झाल्याची कबुली देत यासाठी मी कुणाकडे शिकण्यासाठी गेलो नाही, असेही त्यांनी सांगितले.
माझे प्राथमिक शिक्षण अकोला जिल्ह्यातील सरसोली येथे तर ८ ते १० वर्गापर्यत राधाबाई गणगणे विद्यालय मुंडगाव येथे झाले. इयत्ता चवथीमध्ये असतानाच खंजेरी वाजविण्याची कला अवगत करीत तुकडोजी महाराजांचे भजन तथा गाडगेबाबांचे ‘गोपाला गोपाला’ या कीर्तनातूनच प्रेरणा घेतली. प्रबोधनाचा पहिला मोठा कार्यक्रम राष्ट्रसंतांच्या आठव्या पुण्यतिथी कार्यक्रमात मोझरी येथे केला. त्यानंतर सत्यपाल महाराजांनी पूर्ण राज्यभर १३ हजार ५०० प्रबोधनात्मक कार्यक्रम केले आहेत.
शिवाजी महाराज, फुले , शाहु, आंबेडकर यांच्या विचारातून समाजातील अंधश्रद्धा, वाईट रुढीवर आघात करताना अनेक गावात विरोध झाला. जळगाव जिल्ह्यात कीर्तनाचा कार्यक्रम बंद करण्याचा प्रसंग ओढवला होता. मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई येथील कार्यक्रमात एका माथेफिरूने चाकू हल्ला करून जखमी केले. मात्र या भ्याड हल्ल्यातून आपण बचावलो, असेही सत्यपालांनी यावेळी सांगितले.
समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. हा संकल्प फुले शाहु, आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या स्वछतेचा मंत्र जनतेत पोहचून समाज परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामध्ये काही प्रमाणात यश येत आहे. समाज प्रबोधन करायचे असल्याने मी माझ्या कीर्तनाला व्यावसायिक स्वरुप दिले नाही. कारण या परिवर्तनाची मलाच गरज आहे, असेही महाराज म्हणाले. या प्रबोधनातून युवा पिढीने तंबाखु, खर्रा, दारू अशा व्यसनापासून दूर राहून फुले, शाहु, आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून सज्जन माणूस बनविण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ त्यांनी स्पष्ट केले.