सात जणी लढल्या, एकच जिंकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:47 PM2019-03-19T22:47:29+5:302019-03-19T22:47:50+5:30
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५१ ते २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सात महिल्या लढल्या असल्या तरी यामध्ये एका महिलेने ही निवडणूक जिंकून या मतदार संघाच्या पहिल्या खासदार होण्याचा मान मिळविला. गोपिकाताई कन्नमवार असे या पहिल्या महिला खासदाराचे नाव आहेत. गोपिकाताई या महाराष्ट्राचे दुसरे आणि चंद्रपूर जिल्ह्यातून झालेले पहिले मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या सहचारिणी होत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५१ ते २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सात महिल्या लढल्या असल्या तरी यामध्ये एका महिलेने ही निवडणूक जिंकून या मतदार संघाच्या पहिल्या खासदार होण्याचा मान मिळविला. गोपिकाताई कन्नमवार असे या पहिल्या महिला खासदाराचे नाव आहेत. गोपिकाताई या महाराष्ट्राचे दुसरे आणि चंद्रपूर जिल्ह्यातून झालेले पहिले मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या सहचारिणी होत.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९६४ आणि १९६७ या निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदा गोपिकाताई कन्नमवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. १९६४ मध्ये झालेली पोटनिवडणूक त्या जिंकल्या आणि या मतदार संघाच्या पहिल्या महिला उमेदवार होण्याचा मान त्यांना मिळाला. यानंतर १९६७ मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली मात्र यात त्यांचा पराभव झाला. यानंतर २०१४ च्या निवडणुकीपर्यंत एकाही प्रमुख राजकीय पक्षाने महिलांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही. हे विशेष.
१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत लाल श्यामशाहा लाल भगवानशाहा हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळी निर्वासितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न व आदिवासींचे मूळ प्रश्न डावलून बांग्लादेशाच्या निर्वासितांना आश्रय देण्याला प्राधान्य दिले जात होते. ही बाब त्यांनी खटकली. त्यांनी याकडे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लक्ष वेधले. यानंतर त्यांनी ५ सप्टेंबर १९६२ रोजी खासदारकीची शपथ घेतली. मात्र त्यांना सरकारच्या धोरणाविरुद्ध दुसऱ्यादिवशी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. तो २४ एप्रिल १९६४ ला राजीनामा मंजूर झाला. यानंतर १९६४ मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत गोपिकाताई कन्नमवार या विजयी झाल्या. त्या या मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. यानंतर १९६७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.
यानंतर आजवरी अन्य सहा महिलांनी लोकसभा निवडणूक लढली. यामध्ये १९८० मध्ये जेएनपी(एस) कडून प्रतिमा नुरुद्दीन, १९८४ मध्ये जयश्री इंगळे (अपक्ष), १९८९ मध्ये उर्मिला बलवंत पाठक (डीडीपी), १९९१ मध्ये ज्येष्ठगौरी भावसार (अपक्ष), १९९६ मध्ये सत्यशिला रायपुरे (अपक्ष) व २००४ मध्ये तायरा छोटु शेख (अपक्ष) या महिला निवडणूक लढल्या मात्र यात त्यांना यश आले नाही.
महिला उमेदवार
१९६४ - गोपिकाताई कन्नमवार (भाराकाँ) - विजयी
१९८० - प्रतिमा नुरुद्दीन (जेएनपी(एस) - पराभूत
१९८४ - जयश्री इंगळे (अपक्ष) - पराभूत
१९८९ - उर्मिला बलवंत पाठक(डीडीपी) - पराभूत
१९९१ - ज्येष्ठगौरी भावसार (अपक्ष) - पराभूत
१९९६ - सत्यशिला रायपुरे (अपक्ष) - पराभूत
२००४ - तायरा छोटु शेख (अपक्ष) - पराभूत